मुंबई |
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य फेरीतील क्रिकेटचा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम खेळण्यात आला. संजू सॅमसनने ४२ चेंडूत झळकविलेल्या ८९ धावा आणि ईशान किशन व शिवम दुबेच्या निर्णायक फलंदाजीने भारतीय संघाने ७ गडी बाद २५३ धावा करत इंग्लंडच्या संघापुढे २५४ धावांचे आव्हान ठेवले. आजच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून जेकब बेथेलने ४८ चेंडूत १०५ धावा केल्या.इंग्लंडच्या संघाने ७ गडी बाद २४६ धावा केल्या. भारतीय संघाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून संजू सॅमसन व अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीस आले. धुवाधार फटकेबाजीने सलामीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरवात केली. सामन्याच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस विल जॅक्सच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना फिल साॅल्ट करवी अभिषेक शर्मा झेल बाद झाला. अभिषेक शर्माने ७ चेंडूत ९ धावा केल्या. ईशान किशन व संजू सॅमसन धुवाधार फ्लांदाजी करत असताना ९ व्या षटकात आदिल रशीदच्या गोलंदाजीवर विल जॅक्स करवी ईशान किशनला झेल बाद झाला. ईशान किशनने १८ चेंडूत २ षट्कार व ४ चौकार लगावत एकूण ३९ धावा केल्या.
सामन्याच्या १४व्या षटकात विल जॅक्सच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत असणारा ईशान किशन फिल साॅल्ट करवी झेल बाद झाला. ईशान किशनने ४२ चेंडूत ७ षट्कार व ८ चौकार लगावत एकूण ८९ धावा केल्या.तर १६ व्या षटकात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव जॉस बटलर करवी ११ धावांवर यष्टीचीत झाला. १८ व्या षटकात अर्धशतक पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेला शिवम दुबे हॅॅरी ब्रुक करवी झेल बाद झाला. शिवम दुबेने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. १९ व्या षटकाच्या अखेरीस जोफरा आर्चरच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा त्रिफळाचीत होत भारतीय संघाचा ६ वा गडी बाद झाला. तिलक वर्माने ७ चेंडूत २१ धावा केल्या.पाठोपाठ हार्दिक पांड्या २७ धावा करून जेकॉब बेथेल करवी धावबाद झाला. २० व्या षटका अखेरीस भारतीय संघाने ७ गडी बाद २५३ धावा केल्या.
इंग्लंडच्या संघाकडून फिल साल्ट व जोस बटलर प्रथम फलंदाजीस आले. दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फिल साल्ट फटकेबाजीच्या प्रयत्नात असताना अक्षर पटेलने फिलला झेल बाद करत इंग्लंडच्या संघास पहिला धक्का दिला.फिलने ३ चेंडूत ५ धावा केल्या. ५व्या षटकात अक्षर पटेलने हॅॅरी ब्रुकला अवघ्या ७ धावांवर झेल बाद करत इंग्लंडचा दुसरा खेळाडू बाद केला. ६व्या षटकात वरून चक्रवर्तीने जॉस बटलरला त्रिफळाचीत करून तंबूत परत पाठविले. जॉस बटलरने १७ चेंडूत २५ धावा केल्या.८व्या षटकात वरून चक्रवर्तीने टॉम बँटनला १७ धावांवर त्रिफळाचीत करत इंग्लंडच्या संघाचा चौथा खेळाडू बाद केला.१० व्या षटका अखेर इंग्लंडच्या संघाने ४ गडी बाद ११९ धावा केल्या. सामन्याच्या १४ व्या षटकात शिवम दुबेने विल जॅक्सला ३५ धावांवर झेल बाद
केले.
१९ व्या षटकात तिलक वर्माने सॅम करनला १८ धावांवर झेल बाद करत इंग्लंडच्या संघाचा ६ वा खेळाडू बाद केला.अखेरच्या षटकात १०५ धावा करणाऱ्या जेकब बेथेलला हार्दिक पांड्याने झेल करत इंग्लंडच्या संघाचा ७ वा खेळाडू बाद केला. २० व्या षटका अखेर इंग्लडच्या संघाने ७ गडी बाद २४६ धावा केल्या. भारतीय संघाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.




