बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर आज ‘टी-२० वर्ल्ड कप-२०२४’ चा क्रिकेटचा चुरशीचा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळण्यात आला. यात विराट कोहली, अक्षर पटेलची तडाखेबाज फलंदाजी तर हार्दिक पांड्या व अर्शदीपच्या शानदार गोलंदाजीने भारतीय संघ ICC T-20 World Cup-2024 चा विश्वविजेता संघ ठरला आहे.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा व ऋषभ पंत सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर हेनरीच क्लासेनने रोहित शर्माला झेल बाद करत भारतीय संघास पहिला धक्का दिला. रोहित शर्मा ने ५ चेंडूत ९ धावा केल्या. लागोपाठ केशव महाराजच्या गोलंदाजीवर डी कॉकने ऋषभ पंतला झेल बाद करत शून्य धाव संख्येवर माघारी पाठविले.चौथ्या षटकात कासिगो रबाडाच्या गोलंदाजीवर हेनरीच क्लासेनने सुर्यकुमार यादवला झेल बाद केले .सुर्यकुमार यादवने ४ चेंडूत ३ धावा केल्या. पाचव्या षटका अखेरीस भारतीय संघाची ३९ धावा ३ गडी बाद अशी स्थिती होती.
विराट कोहली अक्षर पटेलच्या जोडीने तडाखेबाज फलंदाजी करत भारतीय संघाच्या धावा वाढविल्या. चौदाव्या शतकात डी कॉकने अक्षर पटेलला धाव चीत केले.अक्षर पटेलने ३१ चेंडूत ४ षटकार व १ चौकार लगावत एकूण ४७ धावा केल्या. अठराव्या षटकात कासिगो रबाडाने विराट कोहलीला झेल बाद केले. विराट कोहलीने ५९ चेंडूत २ षटकार व ६ चौकार लगावत ७६ धावा केल्या. शिवम दुबे ने २७ धावा करत डेविड मिलर कडून शेवटच्या षटकात झेल बाद झाला. अखेरच्या षटकाअंती भारतीय संघाने ७ गडी बाद १७६ धावा केल्या.
भारतीय संघाने दिलेल्या १७७ धावांचे आव्हान पार करताना रीझा हेंड्रिक्स व क्विंटन डी कॉक प्रथम फलंदाजीस आले.सामन्याच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने रीझा हेंड्रिक्सला अवघ्या ७ धावांवर क्लीन बोल्ड करत तंबूत परत पाठविले. तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने एडन मार्करमला झेल बाद करत ४ धावांवर माघारी पाठविले. नवव्या षटकात अक्षर पटेलने ट्रिस्टन स्टब्सला क्लीन बोल्ड करत आफ्रिकेच्या संघाचा तिसरा फलंदाज तंबूत परत पाठविला.ट्रिस्टन स्टब्सने २१ चेंडूत ३१ धावा केल्या.
तेराव्या षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवने क्विंटन डी कॉकला झेल बाद केले.डी कॉकने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या.अठराव्या षटकाहार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने हेनरिक क्लासेनला झेल बाद करत आफ्रिकेच्या संघाचा ५ वा गडी बाद केला. हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. अठराव्या साव्या षटकाच्या चौथ्या चेंडूत जसप्रीत बुमराहने मार्को यान्सिनला क्लीन बोल्ड करत २ धावांवर माघारी पाठविले. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादवने डेविड मिलरला झेल बाद केले.डेविड मिलरने १७ चेंडूत २१ धावा केल्या. अखेरच्या षटकातील हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर ५ व्या चेंडूतवर सुर्यकुमार यादवने कासिगो रबाडाला झेल बाद करून भारतीय संघास विजय प्राप्त करून दिला.