Monday, November 25, 2024
Homeक्रीडाICC World Cup 2023 : भारत-अफगाणिस्तान आज भिडणार, कोण मारणार बाजी?

ICC World Cup 2023 : भारत-अफगाणिस्तान आज भिडणार, कोण मारणार बाजी?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा नववा सामना आज बुधवारी अफगाणिस्तान विरुद्ध भारत संघांमध्ये नवी दिल्लीच्या अरूण जेटली क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. तर हशमतुललाह शाहिदी अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथील सलामी सामन्यात शानदार विजय संपादन करून भारतीय क्रिकेट संघाने शानदार विजयी सलामी दिली आहे.आता अफगाणिस्तान संघावर विजय संपादन करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा निर्धार असणार आहे.

दुसरीकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आपल्या सलामी सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. आता भारतीय क्रिकेट संघाला पराभूत करून आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी अफगाणिस्तान संघ खास डावपेच आखून मैदानावर उतरण्यासाठी सज्ज असणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये आतापर्यंत ३ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले आहेत. दोन्ही संघांमध्ये पहिला सामना २०१४ मध्ये मिरपुर येथे खेळविण्यात आला होता. त्यानंतर २०१८ मध्ये सामना टाय झाला होता.

२०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत झालेला सामना भारतीय क्रिकेट संघाने जिंकला होता.भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गीलला डेंग्यूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. आता अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यातही त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये अनेक रोमांचक लढती झाल्या आहेत. हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी जमेची बाजू म्हणजे के एल राहुल आणि विराट कोहली लयीत आहेत. ऑस्ट्रेलिया विरुध्द सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या ईशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांच्याकडून मोठी खेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित असणार आहे.

गोलंदाजी मध्ये जसप्रीत बुमराह, महमंद सिराज, रविंद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पांडया या सर्व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी बजावली होती.आता अफगाणिस्तान संघाविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये सातत्य राखण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.

अफगाणिस्तान संघाचे सर्व फलंदाज आपल्या सलामी सामन्यात सपशेल अपयशी ठरले होते.सलामीवीर फलंदाज रेहमनुललाह गुरबाझ वगळता इब्राहिम झरदान, महमंद नाबी यांनी निराशा केली होती. गोलंदाजी मध्ये रशिद खानची जादू फिकी पडली होती.भारतीय संघाविरुद्ध आपला खेळ उंचावण्यासाठी अफगाणिस्तान संघांचा इरादा असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या