विश्वकप स्पर्धेत सलग सहा विजय मिळवून गुणतालिकेत भारतीय संघ अग्रस्थानी असला तरी गुरुवारी 2 नोव्हेंबरला ज्यावेळी भारतीय संघ मुंबईत श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल व त्या सामन्यात जर भारताने लंकेला हरवले तर भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होणार आहे. अर्थात, या सामन्यात दुर्दैवाने भारताला पराभव पाहावा लागला तरी उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा भारताच्या जिवंत राहतील. कारण, त्यानंतर आणखी दोन सामने दक्षिण आफ्रिका व नेदरलँड संघांशी भारताचे आहेत. यातील नेदरलँड संघाला आरामात मात देऊन उपांत्य फेरीत पोहोण्याची भारतीय संघाची शक्यता 100 टक्के आहे.
ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला देश, न्यूझीलंड व इंग्लंड अशा सहा संघांना पराभूत करून भारतीय संघाने सलग सहा विजय मिळवले. या वर्ल्ड कपमध्ये अन्य कोणत्याही संघाला ही गोष्ट जमलेली नाही. भारताने या सामन्यात रोहित शर्माच्या 87 धावांच्या जोरावर 229 धावा उभारल्या. विजयासाठी हे आव्हान फार काही मोठे नव्हते. पण भारताच्या गोलंदाजांनी हा सामना खेचून आला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी यावेळी तिखट मारा केला. त्यामुळे भारताने इंग्लंडवर तब्बल 100 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा सलग सहावा विजय ठरला.
या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाचे एकूण 9 सामने होणार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या सहा सामन्यांमध्ये भारताने सर्वच्या सर्व म्हणजेच सहा विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे 12 गुण झाले आहेत आणि गुणतालिकेत भारतीय संघ हा अव्वल स्थानावर आहे. पण, भारताने सहाव्या विजयानंतरही सेमी फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केलेले नाही. भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, ही गोष्ट नक्की. पण या वर्ल्ड कपमध्ये जर सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर कोणत्याही संघाला किमान सात सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. भारताने सहा विजय मिळवत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे, पण सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. पण भारताने जर पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांना सेमी फायनलमध्ये प्रवेश करता येईल. त्यामुळे भारतासाठी पुढचा सामना सर्वात महत्वाचा असणार आहे.
भारतीय संघाची शिस्तबद्ध वाटचाल पाहता सहावा सामनाही भारत सहज जिंकेल अशी स्थिती आहे. श्रीलंकेला कालच अफगाणीस्तानने सहज मात दिली आहे. या स्पर्धेतील श्रीलंका व इंग्लंड संघांची कामगिरी दयनीय राहिली आहे. या पार्श्वभूमीवर भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचे सिंहली खेळाडू उसळून उठले व किमान वर्ल्ड कपमधून बाहेर पडताना बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवण्याचा त्यांचा इरादा असेल तर भारताला सावध खेळावे लागणार आहे. सलग सहा विजयांचा फाजिल आत्मविश्वास भारताला घातक ठरू शकतो. सहापैकी पाच विजय भारताने धावांचा पाठलाग करून जिंकले व सहावा इंग्लंडविरुद्धचा सामना 100 धावा राखून जिंकला आहे. पण या सामन्यात शुभमन गिल, विराट कोहली व श्रेयस अय्यर यांचे अपयश भारताला विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे आता सातवा विजय पदरात पाडून उपांत्य फेरी गाठण्याचे भारतासमोरील आव्हान क्रीडा शौकिनांचीही उत्सुकता वाढवत आहे.