विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीच्या काळात गोलंदाजांचा जबरदस्त दबदबा होता. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत अन् पाकिस्तान या संघांतील जलदगती गोलंदाजांनी त्यांच्या कारकीर्द चांगलीच गाजवली आहे. त्यांच्यासमोर खेळपट्टीवर टिकणे मोठे जिकिरीचे काम होते. अशा परिस्थितीतही अनेक फलंदाजांनी मोठ्या कौशल्याने खेळपट्टीवर टिकून चांगली भागीदारी केली अन् संघाला जिंकूनही दिले. बदलत्या काळात धावा कुटण्याचे तंत्रही बदलले. धावा करताना मोठी भागीदारी करण्याचे अनेक विक्रम मोडीत निघाले. आज आपण विश्वचषकातील धावांच्या भागीदारीचे विक्रम पाहूया.
-
पहिली विकेट – आजपर्यंतच्या स्पर्धांत पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम श्रीलंकन फलंदाजांच्या नावावर आहे. 2011च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा या सलामीच्या जोडीने तब्बल 282 धावांची भागीदारी केली होती. तिलकरत्नेने 131, तर थरंगाने 131 धावा केल्या होत्या.
-
दुसरी विकेट – वेस्ट इंडिज फलंदाजांनी विश्वचषकात दुसर्या विकेटसाठी केलेली भागीदारी आजपर्यंत कुठलाही संघ तोडू शकलेला नाही. सन 2015च्या विश्वचषकात ख्रिस गेल (215) व मार्लन सॅम्युअल्स (133) या जोडीने झिम्बाब्वेविरुद्ध डावांचा डोंगर उभारून दुसर्या विकेटसाठी 372 धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती. कुठल्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे.
-
तिसरी विकेट – सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांनी 1999मध्ये केनियाविरुद्ध तिसर्या विकेटसाठी 237 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. त्यात सचिनने 140, तर द्रविडने 104 धावा फटकावल्या होत्या.
-
चौथी विकेट – धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मायकेल क्लार्क आणि ब्रॅड हॉज या ऑस्ट्रेलियन जोडीने 2007 च्या स्पर्धेत नेदरलँड संघाविरुद्ध चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली होती.
-
पाचवी विकेट – 2015च्या मोसमात झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनी आणि डेव्हिड मिलर या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 256 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
-
सहावी विकेट – आयलंड या नवख्या संघातील अॅलेक्स कुसॅक व केविन ओब्रायन यांनी 2011मध्ये बलाढ्य इंग्लंडविरुद्ध सहाव्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली होती.
-
सातवी विकेट – सध्याच्या म्हणजेच 2023च्या स्पर्धेत सातव्या विकेटसाठीच्या भागीदाराचा विक्रम मोडला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नेदरलँडच्या सायब्रँड इंजेलब्रेच व लोगान वॅन बीक या जोडीने 130 धावांची भागीदारी करून विक्रम केला आहे.
-
आठवी विकेट – 1987च्या विश्वचषकात झिम्बाब्वेच्या डेव्हिड हॉटन व इयान बुचार्ट या तळाच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्दच्या सामन्यात आठव्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली होती.
-
नववी विकेट – भारताच्या कपिल देव व सय्यद किरमानी यांनी 1983च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध नवव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली होती. ती आजतागायत अबाधित आहे.
-
दहावी विकेट – वेस्ट इंडिजच्या अँडी रॉबर्टस् आणि जोएल गार्नर या जोडीने 1983मध्ये भारताविरुद्ध अंतिम विकेटसाठी 71 धावांची सर्वोच्च भागीदारी केली आहे.