विश्वचषकाच्या गुणतालिकेत दररोज बदल होतोय. दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर असताना टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवल्याने आता आफ्रिका दुसर्या क्रमांकावर गेली असून, भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे. भारताने सांघिक कामगिरी करताना सलग सात विजय नोंदवले असले तरी वैयक्तिक कामगिरीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक हा फलंदाजीत तर पाकिस्तानचा शाहीनशाह आफ्रिदी गोलंदाजीत आघाडीवर आहेत.
विश्वचषक आता उत्तरार्धाकडे झुकला आहे. आतापर्यंत विश्वचषकात 33 सामने झाले आहेत. म्हणजेच 67 % वर्ल्ड कप संपला आहे. राहिलेले सर्व सामने पाहता कोण पुढे जाईल व सेमी फायनलमध्ये कोणते चार संघ असतील, याची उत्सुकता वाढू लागली आहे. विक्रमावर विक्रम या स्पर्धेत होत आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना दिवाळी आधीच मेजवानी मिळत आहे.
विक्रमांची रचली रास
सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजात सध्या तीन खेळाडू आघाडीवर आहे. मात्र, त्यात कमीतकमी धावा देत चांगल्या इकॉनॉमी रेटने विकेट मिळवण्यात पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सन यांनी प्रत्येकी 16-16 विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या जसप्रीत बुमराहच्या नावावर 15 विकेट्स आहेत. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीमध्ये पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात 54 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. भारताच्या मोहंमद शमीनेही न्यूझीलंडविरोधात पाच विकेट्स घेतल्यात.
सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रीकेचा सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड करण्याच्या स्थितीत आहे. क्विंटन डीकॉकने सात डावात 545 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर न्यूझीलंडचा रचित रविंद्र (415) आणि तिसर्या क्रमांकावर डेविड वॉर्नर (413) आहे. रोहित शर्मा 402 धावा करून चौथ्या स्थानावर आहे. सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड्ही क्विंटन डिकॉकच्या नावावर आहे. त्याने 24 ऑक्टोबर रोजी 174 धावांची खेळी केली आहे. याशिवाय सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्याने केला असून, डिकॉकने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत.
सर्वोच्च धावसंख्या दक्षिण आफ्रिकेने सात ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरोधात उभारली आहे. या सामन्यात 50 षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 428 धावांचा डोंगर त्यांनी उभारला होता. आतापर्यंत विश्वचषकातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तर स्पर्धेतील सर्वात मोठा विजय ऑस्ट्रेलियाने मिळवला. त्यांनी 25 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरोधात 309 धावांनी विजय मिळवला. सध्याच्या विश्वचषकातील हा सर्वात मोठा विजय आहे. त्याखालोखाल भारताने श्रीलंका संघाला 302 धावांनी नमवले आहे.
रोहित आघाडीवर
सर्वाधिक षटकार मारण्याच्या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याने यंदाच्या विश्वचषकातील सामन्यांतून सर्वाधिक षटकार मारले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत सहा डावात 20 षटकार ठोकले. दुसर्या क्रमांकावर डेविड वॉर्नर (19) आणि तिसर्या स्थानावर डिकॉक (18) आहे.