तब्बल 16 संघांचा समावेश हे प्रमुख वैशिष्ट्य असणारी नववी विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली होती. 13 मार्च ते 28 एप्रिल 2007 या दरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड, बांगलादेश, झिम्बाब्वे, केनिया, कॅनडा, नेदरलँड, स्कॉटलंड, बर्मुडा व आयलंड हे 16 संघ सहभागी झाले होते. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाने सहज पराभूत केले होते, तर श्रीलंकेने न्यूझीलंडला नमवले होते. हे दोन्ही संघ दुसर्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमने सामने होते. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पाचव्यांदा, तर श्रीलंका दुसर्यांदा पोहोचला होता. दोन्हीही संघ विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.
दि. 28 एप्रिल 2007 रोजी बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने घेतला. मात्र, पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाल्याने सामना 38 सामन्यांचा ठेवण्यात आला. अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. गिलख्रिस्टने चौकार-षटकारांच्या साथीने आपले शतक पूर्ण केले. त्याला मॅथ्यू हेडनची संयमी साथ लाभली.धावांचा वेग आणखी वाढवताना 23व्या षटकात मलिंगाच्या चेंडूवर हेडन (38 धावा) झेलबाद झाला. 172 धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला बळी गेला. त्यानंतर कप्तान रिकी पाँटिंग आला.
224 धावा फलकावर लागल्या असतानाच 31व्या षटकात फर्नांडोच्या चेंडूवर गिलख्रिस्टचा (104 चेंडूंत 149 धावा) झेल सिल्वाने पकडला. त्याने तब्बल 13 चौकार व 8 षटकार खेचले. पाँटिंग (37 धावा) धावबाद झाला. शेन वॉट्सनला मलिंना परत पाठवले. साधारण सातच्या सरासरीने ऑस्ट्रेलियाच्या संघाने 38 षटकांत 4 गड्यांच्या बदल्यात 281 धावा केल्या. मलिंगाने 2 बळी, तर फर्नांडोने 2 बळी घेतले.
श्रीलंकेच्या डावाची सुरुवात उपुल धरंगा व सनथ जयसूर्या यांनी केली. मात्र, त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. केवळ 7 धावा असताना धरंगाचा (6 धावा) बळी ब्रॅकनने घेतला. त्यानंतर मात्र कुमार संगकाराने चांगल्या धावा केल्या. दुसर्या गड्यासाठी जयसूर्याच्या साथीने त्याने 116 धावांची भागीदारी केली. 123 धावा फलकावर असताना संगकाराला (54 धावा) हॉगने झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी करत होते. जयसूर्याने षटकार मारत होता. मायकल क्लार्कच्या एका चेंडूवर मात्र जयसूर्या त्रिफळा बाद झाला. त्याने 63 धावा केल्या. श्रीलंकेची स्थिती 145/3 अशी झाली.
पावसामुळे श्रीलंकेला विजयाचे लक्ष्य 281 वरून 36 षटकांत 269 असे दिले गेले. धुरंधर फलंदाज बाद झाल्याने श्रीलंकेच्या उर्वरित फलंदाजांवर कमालीचा दबाव जाणवत होता. महेला जयवर्धने (19 धावा), चमारा सिल्वा (21 धावा), दिलशान तिलकरत्ने (14), रसेल अर्नोल्ड (1 धाव), चामिंडा वास (11), लसिथ मलिंगा (10) या फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. कमी प्रकाशामुळे शेवटची तीन षटके दुसर्या दिवशी टाकण्याचे पंचांनी घोषित केले. मात्र, श्रीलंकेला 18 चेंडूंत 61 धावांची आवश्यकता असल्याने कर्णधार जयवर्धनेने तीनही षटके लगेचच खेळण्याची तयारी दाखविली. त्यामुळे शेवटची तीन षटके जवळपास अंधारातच टाकली गेली. 36 षटकांत श्रीलंकेची मजल केवळ 215 धावांपर्यंतच पोहोचली. श्रीलंकेचा 53 धावांनी पराभव केला. मायकेल क्लार्कने सर्वाधिक 2 बळी घेतले. अॅडम गिलख्रिस्टला सामनावीर घोषित करण्यात आले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा हा सलग तिसरा विजय होता. या विजयाच्या रूपाने कांगारूंनी विश्वचषकी चौकार मारला होता.
– संदीप जाधव
9225320946