आठवी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 9 फेब्रुवारी ते 23 मार्च 2003 या दरम्यान झाली. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया सह यजमान असलेली ही स्पर्धा आफ्रिकेत खेळली गेली. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, बांगलादेश, कॅनडा, केनिया, नामिबिया, नेदरलँड असे तब्बल 14 संघ प्रथमच स्पर्धेत सहभागी झाले होते. धक्कादायकरित्या पहिल्यांदाच उपांत्यफेरीत पोहोचलेल्या केनिया संघाने जगभरातील क्रिकेट रसिकांची वाहवा मिळविली होती. भारताने त्यांना पराभूत करून, तर श्रीलंकेला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग रोजी 23 मार्च 2003 रोजी होणार्या अंतिम लढतीत नवा विश्वविजेता ठरणार होता. कप्तान रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात गतविजेता ऑस्ट्रेलिया व सौरभ गांगुलीच्या कप्तानीत भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज होता. विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा, तर 1983नंतर भारत दुसर्यांदा पोहोचला होता. विश्वजेतेपदासाठी दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेल्या अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन या जोडीने पहिल्याच षटकापासूनच आक्रमक फटके मारले.
जहीर खानच्या पहिल्याच षटकात त्यांनी 15 धावा कुटल्या. तंत्रशुद्ध फटकेबाजीने गिलख्रिस्टने अर्धशतक पूर्ण केले. धावफलकावर 105 धावा असताना चौदाव्या षटकात तो हरभजनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विरेंद्र सेहवागने त्याचा झेल टिपला. गिलख्रिस्टने 57 धावा केल्या. त्यानंतर कप्तान रिकी पाँटिंग मैदानात आला. त्यानेही आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. विसाव्या षटकात हरभजनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू हेडनच्या (37 धावा) रुपाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा बळी गेला. त्यानंतर मात्र कप्तान पाँटिंगने चौकार, षटकार ठोकत शतकी खेळी (140 धावा) केली. त्याला डॅमियन मार्टिनन (88 धावा)े सुरेख साथ दिली. या जोडीने नाबाद 234 धावांची विक्रमी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने केवळ 2 गड्यांच्या बदल्यात 50 षटकांत 359 धावा ठोकल्या. भारतीय गोलंदाज पुरते हतबल झाले होते. दोन्ही बळी हरभजनला मिळाले.
360 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याचे मनसुबे घेऊन भारतीय फलंदाज मैदानात उतरले. सचिन तेंडूलकर व विरेंद्र सेहवाग सलामीला आले. पहिला चौकार लगावल्यानंतर सचिन मोठी धावसंख्या करेल या अपेक्षेत असलेल्या भारतीय प्रेक्षकांचा पहिल्याच षटकात भ्रमनिरास झाला. मॅकग्राथने टाकलेला चेंडू सीमापार टोलावण्याच्या नादात सचिन (4 धावा) झेलबाद झाला आणि कांगारूंचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर कप्तान सौरव गांगुली फलंदाजीला आला. त्याने सेहवागच्या साथीने धावफलक हलता ठेवला. मात्र, 58 धावा असतानाच गांगुली (24) धावबाद झाला. त्यानंतर लगेचच मोहंमद कैफ शून्यावर तंबूत परतला आणि भारताची अवस्था 3 बाद 59 अशी झाली.
राहुल द्रविडच्या (47 धावा) साथीने सेहवागने चौथ्या गड्यांसाठी 88 धावांची भागीदारी केली. चोविसाव्या षटकात सेहवाग (82 धावा) धावबाद झाला. त्यानंतर युवराज सिंगने (24 धावा) बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्यानंतरचे फलंदाजही कांगारूंच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाही आणि भारताचा डाव 39.2 षटकांत 234 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने तिसर्यांदा विश्वचषक जिंकला. सामन्यात मॅकग्राथने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर ब्रेट ली व अॅन्ड्-यू सायमंड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा सौरव गांगुलीचा निर्णय पुरता फसला होता. 1983मध्ये पहिल्यांदा विश्वकप जिंकून इतिहास घडवणार्या भारताला 20 वर्षांनी आलेली दुसरी संधी मात्र साधता आली नाही.
– संदीप जाधव
9225320946