Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाICC World Cup Records : 11 धावांत 8 गड्यांचे पतन!

ICC World Cup Records : 11 धावांत 8 गड्यांचे पतन!

पहिल्या विश्वचषकावर आक्रमकपणे ऑस्ट्रेलियाला हरवून आपले नाव कोरलेल्या वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वास दुसर्‍या म्हणजेच 1979 च्या विश्वचषकात कमालीचा होता. विजयाचे दावेदार म्हणूनच ते मैदानात उतरले होते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांना त्यांनी चांगलीच टक्कर दिली. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये लॉर्डसवर 9 जून ते 23 जून दरम्यान झाली. 1975 प्रमाणे या स्पर्धेतही आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. कॅनडा संघाने या स्पर्धेत पदार्पण केले होते. ईस्ट आफ्रिका संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला होता. आशियातून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन संघ सहभागी होते. 15 सामन्यानंतर दुसरा विजेता मिळाला होता. भारत आणि श्रीलंका एका ग्रुपमध्ये होते.

अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान क्लाईव्ह लॉईड, तर इंग्लंडचा कप्तान माईक  ब्रेअरली समारोसमोर ठाकले होते. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली, ग्रीनिज, हेन्स, कालिचरण आणि कर्णधार क्लाईव्ह लॉईड बाद झाल्यानंतर संघाची अवस्था 99/4 अशी झाली. मात्र, व्हिव्हियन रिचर्ड्स (157 चेंडूत 138 धावा, 11 चौकार, 3 षटकार) आणि कॉलिस किंग (66 चेंडूत 86, 10 चौकार, 3 षटकार) यांनी डाव बळकट केला. किंगने विशेषत: 130.3 च्या स्ट्राइक रेटसह इंग्लिश गोलंदाजीला चांगलेच फोडून काढले. कॉलिस किंग बाद झाल्याने 139 धावांची भागीदारी संपुष्टात आली तेव्हा वेस्ट इंडिजची 5/238 अशी अवस्था होती. त्यानंतर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि त्यानंतर गोलंदाजांनी संयमी खेळ करत धावांचे शेपूट 286 धावापर्यंत वाढवले.

- Advertisement -

ही धावसंख्या 60 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात झाली. वेस्ट इंडिजतर्फे व्हिव्हियन रिचर्डसने स्फोटक खेळी करत 138 धावा कुटल्या. त्या पाठोपाठ कॉलिस किंगने वेगात खेळ करून 86 धावा फटकावल्या. इयान बोथम, माईक हॅड्रिक, ख्रिस ओल्ड आणि फिल एडमंड्स यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. एक गडी धावबाद झाला. वेस्ट इंडिजला हरवायचेच या उद्देशाने खेळणार्‍या इंग्लिश फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण सलामीवीर माईक ब्रेअरली (130 चेंडूत 7 चौकार) आणि ज्योफ बॉयकॉट (105 चेंडूत 3 चौकार) यांनी अतिशय संथ गतीने धावा केल्या. त्यांनी 38 षटकात 129 धावांची अत्यंत पद्धतशीर पण संथ सलामी भागीदारी केली, जणू हा सामना पाच दिवसीय कसोटी आहे की काय, अशारितीने ते खेळत होते! नंतर दोन्ही फलंदाज बाद झाले.

ग्रॅहम गूचने 32 धावा करताना काही जोरदार स्ट्रोक खेळले आणि इंग्लंडला 183/2 पर्यंत नेले. तथापि, डेरेक रँडल बाद झाल्यानंतर मात्र क्रिकेट विश्वाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी पतन घडले. कारण इंग्लंडने अवघ्या 11 धावांत तब्बल 8 विकेट गमावल्या. अखेर 51 षटकांत सर्वबाद 194 धावा झाल्या. वेस्ट इंडिजच्या संघाने चांगल्या खेळाच्या जोरावर पुन्हा विश्वचषकावर ताबा मिळविला. इंग्लंडच्या सलामीला फलंदाजीला आलेल्या माईक ब्रेअर्लीने 64, तर जेफ्री बॉयकॉटने 57 धावा केल्या. दोघांनीही कासवगतीने संयमी खेळ करत शंभरावर चेंडू खाल्ले! इंग्लंडच्या अखेरच्या 8 गड्यांच्या पतनात वेस्ट इंडिजच्या जोअल गार्नरचा सर्वाधिक वाटा होता. त्याने 5 बळी टिपले. कॉलिन क्रॉफ्टने 3, तर मायकेल होल्डिंगने 2 बळी घेतले. व्हिव्हियन रिचर्ड्सला सामनावीर घोषित करण्यात आले.

– संदीप जाधव

(9225320946)

- Advertisment -

ताज्या बातम्या