Monday, June 24, 2024
Homeक्रीडाICC World Cup Records : वेस्ट इंडिज ठरला पहिला विश्वविजेता

ICC World Cup Records : वेस्ट इंडिज ठरला पहिला विश्वविजेता

क्रिकेट विश्वचषकाला 1975 साली सुरुवात झाली. पहिलीच स्पर्धा असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये त्याबाबत कमालीचे औत्सुक्य होते. कारण क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा होती. दि 7 ते 21 जून 1975 दरम्यान ही स्पर्धा इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे झाली. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका या आठ संघांत ही स्पर्धा झाली. प्रत्येक सामना 60 षटकांचा होता. पारंपरिक पांढर्‍या कपड्यांमध्ये आणि लाल चेंडूंसह स्पर्धा खेळवली गेली.

- Advertisement -

क्लाईव्ह लॉईड यांच्या कप्तानीत वेस्ट इंडिज, तर इयान चॅपेल यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करणार्‍या वेस्टइंडिजची रॉय फ्रेड्रीक्स आणि गॉर्डन ग्रीनीज ही जोडी मैदानात सलामीला आली. मात्र, अडखळत खेळण्याच्या नादात 50 धावांत त्यांचे 3 गडी बाद झाले. त्यानंतर मात्र कॅप्टन क्लाईव्ह लॉईड मैदानात आला. त्यांनी आत्मविश्वासक फटकेबाजी करत अनेकदा चेंडू सीमापार केला. चौथ्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केल्यानंतर ते 102 धावांवर बाद झाले. 60 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात वेस्टइंडिजच्या 291 धावा झाल्या. सर्वाधिक 5 बळी गॅरी गिरमोर यांनी घेतले.

तगड्या धावसंख्येच्या प्रत्युत्तरासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. अ‍ॅलन टर्नर आणि रिक मॅककॉस्कर ही जोडी सलामीला आली. त्यांनी संयमी खेळ करत असतानाच 25 धावांवर पहिला बळी गेला. त्यानंतरच्या फलंदाजांनी डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. कॅप्टन इयान चॅपेल यांनी सर्वाधिक 62 धावा करून विजयाकडे कूच केली. मात्र, वेस्ट इंडिजच्या भेदक आणि घातक गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. नऊ बाद 233 अशी अवस्था झाल्यानंतर डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांनी अंतिम विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. जेफ थॉमसन धावबाद झाल्यानंतर विश्वचषकावर वेस्ट इंडिजच्या संघाने आपले नाव कोरले. 274 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला. केथ बॉयसी यांनी सर्वाधिक 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचे 5 गडी धावबाद झाले. जल्लोषी वातावरणात क्लाईव्ह लॉईड यांनी चषक स्वीकारला.

न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन टर्नर याने 333 धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्यात पूर्व आफ्रिकेविरुद्धची नाबाद 171 ही सर्वोच्च धावसंख्या होती. दुसर्‍या स्थानावर इंग्लिश खेळाडू डेनिस एमिस आणि पाकिस्तानचा माजिद खान तिसर्‍या क्रमांकावर होता.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज गॅरी गिलमोर केवळ अंतिम दोन सामने खेळूनही 11 विकेट घेऊन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 14 धावांत सहा विकेट्स घेतल्या होत्या.

– संदीप जाधव

(9225320946)

- Advertisment -

ताज्या बातम्या