रंगीत कपडे अन् पांढर्या चेंडूचा प्रथमच वापर हे 1992च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य. 22 फेब्रुवारी ते 25 मार्च 1992 या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा त्या वेळी मात्र 5 वर्षानंतर झाली. स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे या 9 संघांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच विश्वचषक होता. आतापर्यंतच्या विश्वचषकातील अंतिम फेरीत इंग्लंडचा संघ तिसर्यांदा पोहोचला होता. 25 मार्च रोजी मेलबर्नच्या मैदानावर ग्रॅहम गूचच्या कप्तानीत इंग्लंडचा अंतिम सामना इम्रान खानच्या पाकिस्तानशी होता.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आमीर सोेहेल (4 धावा) व रमीज राजा या सलामीच्या जोडीकडून पुरता अपेक्षाभंग झाला. त्यानंतर आलेल्या इम्रान खानने (110 चेंडूत 72 धावा), जावेद मियाँदाद (98 चेंडूत 58 धावा) साथीने धावसंख्या दीडशेपार नेली. फलकावर 163 धावा असतानाच इलिंगवर्थच्या गोलंदाजीवर जावेद झेलबाद झाला. 139 धावांच्या भागीदारीनंतर जावेदच्या रूपाने पाकचा तिसरा बळी गेला. इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच फटकावणारा इम्रान खान बाद झाला तेव्हा धावफलकावर 197 धावा होत्या. नंतर आलेल्या इंझमाम उल हक व वसीम अक्रम या जोडीने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला.
एकेरी-दुहेरीपेक्षा चौकार-षटकार मारण्याचे त्यांचे मनसुबे जाणवत होेते. वेगवान फलंदाजी करीत या जोडीने 38 चेंडूत 52 धावा जोडल्या. शेवटच्या दोन्ही चेंडूंवर अनुक्रमे इंझमाम उल हक व वसीम अक्रम बाद झाले. अंतिम 15 षटकांत पाकच्या फलंदाजांनी 124 धावा केल्या. पाकिस्तानने 50 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावा केल्या. इंग्लंडचा डेरेक प्रिंगल हा सर्वांत जास्त प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत केवळ 22 धावा देऊन 3 बळी घेतले. 5 नो बॉल आणि 3 वाईड्सच्या रूपात त्याने 8 अतिरिक्त धावा दिल्या. रिचर्ड इलिंगवर्थ आणि इयान बॉथम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाकिस्तानला हरवून यंदाचा विश्वचषक आपणच नक्की नेऊ असा आत्मविश्वास इंग्लंडच्या संघाला वाटत होता. 250 धावांचे लक्ष्य त्यांच्यासमोर होते. सलामीला कप्तान ग्रॅहम गूच व इयान बोथम यांची जोडी आली. तिसर्याच षटकात वसीम अक्रमच्या गोलंदाजीवर बॉथमचा झेल मोईन खानने टिपला. नंतर आलेला अॅलेक स्टीवर्ट लवकरच आकिब जावेदच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि इंग्लंडची धावसंख्या 21/2 अशी झाली. फॉर्मात असलेला फलंदाज ग्रीम हिक आणि ग्रॅहम गूच यांनी हळूहळू धावसंख्या पुढे सरकवली. पण मुश्ताक अहमदच्या गुगलीवर हिक बाद केला. लवकरच गूच (66 चेंडूंत 29 धावा) हा मुश्ताकच्या चेंडूवर झेलबाद झाला. धावसंख्या 69/4 अशी झाल्यावर पाकच्या संघात कमालीचा उत्साह संचारला.
नील फेअरब्रदर आणि अॅलन लँब यांनी 72 धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. दुसर्या स्पेलसाठी पुनरागमन करताना वसीम अक्रमने ऍलन लॅम्ब (41 चेंडूंत 31 धावा) आणि ख्रिस लुईस यांना बाद करून इंग्लंडचा प्रतिकार मोडून काढला. नील फेअरब्रदर (70 चेंडूंत 62 धावा) आणि डर्मोट रीव्ह फार काळ टिकू शकले नाहीत. इंग्लंडला 54 चेंडूत 84 धावा हव्या होत्या. फेअरब्रदर आकिबच्या गोलंदाजीवर बाद झाला. अंतिम 12 चेंडूत 34 धावा हव्यात. इम्रान खानने रिचर्ड इलिंगवर्थला बाद केले. इंग्लंडचा पूर्ण संघ 227 धावांत आटोपला. पाकिस्तान 22 धावांनी विजयी झाला. पाकिस्तानकडून आकीब जावेद आणि मुश्ताक अहमद यांनी अनुक्रमे 2 आणि 3 बळी घेतले. वसीम अक्रमला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने बळी घेतले, तसेच 18 चेंडूत 33 धावाही फटकावल्या. पाकने पहिल्यांदाच विश्वचषकावर मोहोर उमटवली.
– संदीप जाधव
(9225320946)