एक सामना कसा सर्व काही उदध्वस्त करू शकतो हे मला माहीत आहे… माझ्या कर्णधारपदाचे सर्वजण कौतुक करीत आहेत. गोलंदाजीतील बदल आणि डावपेचांबद्दलही कौतुक झाले आहे, परंतु पराभवाने सर्व काही बदलून जाईल हे मला माहीत आहे व त्यामुळे मी वाईट कॅप्टन होऊन जाईन… भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केलेली ही भीती सोशल मिडियात चर्चेत आहे.
मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे पण अर्थातच संघ आणि परिस्थिती माझ्या मनात आहे. मी क्रीझवर येऊन विचार न करता माझी बॅट फिरवू लागलो, असे होत नाही. मला बॅट चांगली वापरावी लागेल, असे स्पष्ट करून रोहित म्हणतो, तुम्ही परिस्थिती, धावफलक वाचा आणि योग्य पावले उचलण्याचा प्रयत्न करा. काही वेळा, गोष्टी कार्य करतात, काहीवेळा करत नाहीत. पण, त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. जर मला माहीत असेल की आम्ही जे काही करतो ते संघाच्या हितासाठी आहे, तर ते ठीक आहे. मला माहीत आहे की एक खराब खेळ झाला तर मी एक वाईट कॅॅप्टन होईन….हे रोहितचे भाष्य शौकिनांनाही अचंबित करून गेले आहे.
क्रीजवर आल्यानंतर केवळ शॉट्स खेळण्यावर लक्ष केंद्रीत करीत नाही. चांगली फलंदाजी करावी लागेल आणि संघाला चांगल्या स्थितीत पोहोचण्यास मदत करावी लागेल. या सर्व गोष्टी माझ्या मनात असतात, असे सांगून तो म्हणतो, जेव्हा मी डावाला सुरुवात करतो तेव्हा धावसंख्या शून्य असते. मला डावाची लय ठरवायची आहे. माझ्यावर विकेट पडण्याचे दडपण नाही. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी आला आहे. प्रत्येक संघ दुसर्या संघाला पराभूत करण्याचा प्रयत्न करत असतोे. त्यामुळे आम्ही विरोधी संघाचा फारसा विचार करत नाही आणि संघ म्हणून आणि खेळाडू म्हणून कोणत्या क्षेत्रात आम्हाला काम करायचे आहे यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्याने आवर्जून सांगितले आहे.