Saturday, June 15, 2024
Homeक्रीडाICC World Cup : दोन तपांनंतरचा खणखणीत विजय

ICC World Cup : दोन तपांनंतरचा खणखणीत विजय

फ्रान्समध्ये चार दिवसांपूर्वी (दि. 29 ऑक्टोबर) रग्बी विश्वचषकाची अंतिम लढत झाली. चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडला हरवून विश्वविजेतेपद मिळविलं. तीन पराभवांचा बदला घेतला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पुण्यात झालेल्या सामन्यात पराभवांचा दोन तपांचा इतिहास पुसताना दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडला हरवलं !

- Advertisement -

पुण्यात बुधवारी झालेला हा सामना पाहण्यास दर्दी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. चुरस त्यांना पाहायलाच मिळाली नाही. ब्लॅक कॅप्स निमूटपणे पराभवाला शरण गेले. आधी क्विंटन डीकॉक आणि रसी फनडर डूसेन ह्यांच्या शतकांचा तडाखा त्यांना सोसता आला नाही. मग मार्को यानसेनचा तिखट मारा आणि केशव महाराजच्या फिरकीचं जाळं ह्यात त्यात ते पुरते गुरफटले गेले.

ह्या आधी 1999च्या स्पर्धेत द. आफ्रिकेनं न्यूझीलंडवर 74 धावांनी विजय मिळविला होता. त्यानंतरच्या सलग पाच स्पर्धांमध्ये न्यूझीलंडनं मात केलेली. पुण्यातला विजय निर्विवाद, 190 धावांनी. न्यूझीलंडच्या सर्व फलंदाजांनी केलेल्या धावांपेक्षा 23 अधिक.

नाणेफेकीचा कौल मिळूनही निर्णय घेताना न्यूझीलंडनं सलग दुसर्‍या सामन्यात गफलत केली. लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिका गडबडते, हा इतिहास न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम बहुदा विसरला असावा. त्याची मोठी किंमत त्याच्या संघाने चुकविली. अंगठा फ्रॅक्चर झालेला कर्णधार केन विल्यमसन ह्या सामन्याचं महत्त्व लक्षात घेऊन मैदानात उतरणार होता. पण त्याच्या संघानं तसा धोका घेण्याचं टाळलं.

सलामीवीर टेम्बा बवुमा आणि डीकॉक ह्यांना ट्रेन्ट बोल्टनं बर्‍यापैकी बांधून ठेवलं. पण दुसरीकडे मॅट हेन्रीचा बवुमा समाचार घेत होता. त्यानं त्याच्या दुसर्‍या षट्कात कव्हर ड्राइव्ह आणि पंचवर दोन चौकार मारले. त्यानंतरच्या षट्कात कव्हरवरून षट्कार ठोकला. डीकॉकच्या तुलनेत तो किती तरी आक्रमक होता.

बवुमाचा अडथळा बोल्टनं दूर केला. त्याचा फसलेला ड्राइव्ह डॅरील मिचेलने सफाईने झेलला. त्याच्या 24 धावा 28 चेंडूंमध्ये आणि चार चौकार व एका षट्कारासह. पहिल्या 10 षट्कांमध्ये द. आफ्रिकेला फक्त 43 धावा करता आल्या. टाच दुखावल्यामुळे जायबंदी झालेल्या लॉकी फर्ग्युसनऐवजी संघात आलेल्या टीम साउदीनं पहिल्याच षट्कात डीकॉकला चकवलं होतंच. बॅकवर्ड पॉइंटला असलेल्या ग्लेन फिलिप्सला आटोकाट प्रयत्न करूनही हा झेल पकडणं त्याला जमलं नाही. डीकॉक त्या वेळी 12 धावांवर होता.

डीकॉकच अर्धशतक नंतर 62 चेंडूंमध्ये झालं. त्यासाठी डूसेन ह्याला एक चेंडू कमीच लागला. ग्लेन फिलिप्स व मिच सँटनर ह्यांनी फार सवलत दिली नाही, तरी सतावलंही नाही ह्या जोडीला. त्यामुळे 61 धावांची भर पडली. डीकॉक व डूसेन ह्यांनी एकतिसाव्या षट्कापासून गोलंदाजांवर हुकुमत गाजवणं चालू केलं. त्यांची 100 धावांची भागीदारी सत्ताविसाव्या षट्काअखेरी (111 चेंडूंमध्ये) झाली. पुढच्या 100 धावा काढण्यासाठी त्यांना 77 चेंडू पुरले. भागीदारीचं द्विशतक पूर्ण झालं आणि पुढच्याच चेंडूवर डीकॉक बाद झाला. गोलंदाज तोच, जागा तीच आणि क्षेत्ररक्षकही. पण फिलिप्सने आता चूक केली नाही. विश्वचषक स्पर्धेतलं चौथं शतक नोंदविताना डीकॉक ह्यानं एक सुंदर डाव कसा आकाराला येतो, ह्याचं उदाहरणच दाखवून दिलं. त्याच्या 114 धावा 116 चेंडूंमध्ये. त्यात त्याचे 10 चौकार आणि तीन षट्कार होते.

शतकवीर बाद झाल्याचं सुख न्यूझीलंडला फार काळ भोगता आलं नाही. त्याच्या जागी आलेल्या डेव्हिड मिलरने आल्यापासून दांडपट्टा फिरवणं चालू केलं. डूसेन ह्यानंही चौफेर फटकेबाजी करीत स्पर्धेतंल दुसरं शतक 101 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर बाद होण्यापूर्वीच्या त्याच्या 33 धावा सतराच चेंडूंमध्येच झाल्या! त्यानं व मिलरनं मग जिमी नीशमला लक्ष्य केलं. त्याच्या तीन षट्कांमध्ये 48 धावा चोपल्या. कांगांरूचाच कित्ता गिरवत दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या 10 षट्कांमध्ये नऊ षट्कार मारत 119 धावा केल्या. डूसेन ह्यानं नऊ चौकार व पाच षट्कार मारले. मिलरनं 30 चेंडूंच्या खेळीत 53 धावा (दोन चौकार व चार षट्कार) केल्या. मिलर बाद झाल्यामुळे डावातला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी उतरलेल्या एडन मारक्रम ह्यानंही षट्कार वसूल केला. बोल्टनं किफायतशीर मारा करून एक बळी मिळवला. साउदीनं दोन बळी घेण्यासाठी 77 धावा मोजल्या.

न्यूझीलंडपुढे सलग दुसर्‍या सामन्यात साडेतीनशेहून अधिक धावा करण्याचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राचिन रवींद्र आणि जिमी निशम ह्यांनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. ह्या सामन्यात मात्र तसं काहीच झालं नाही. सहाव्या क्रमांकावर खेळणार्‍या फिलिप्सच्या 60 धावा डावातल्या सर्वोच्च ठरल्या. त्याच्या व्यतिरिक्त सलामीवीर विल यंग (33) व मिचेल (24) ह्यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

मार्को यानसेन ह्यानं डेव्हन कॉनवे आणि स्पर्धेत दोन शतकं काढणारा राचिन रवींद्र ह्यांना पहिल्या पॉवर प्लेमध्येच बाद केलं. आखूड टप्प्याचा किंचित उसळलेला चेंडू कॉनवे ह्याला सोडणं शक्य नव्हतं आणि खेळणंही. त्याच्या बॅटला बाहेरच्या बाजूला लागून गेलेला चेंडू मारक्रमनं दुसर्‍या स्लिपमध्ये झेलला. अशाच उसळत्या चेंडूवर राचिनचा उडालेला झेल फाईन लेगला जेराल्ड किट्झे ह्यानं आरामात घेतला.

पहिला पॉवर प्ले संपला तेव्हा न्यूझीलंडचं अर्धशतक झालं होतं. दुसर्‍या जोडीसाठी झालेली 37 धावांची भागीदारी डावातली सर्वोत्तम. फिलिप्स व मॅट हेन्री ह्यांनी शेवटच्या जोडीसाठी 34 धावांची भर घातली. गंमत म्हणजे ह्या सर्व धावा फिलिप्सच्या बॅटमधून आल्या. ही भागीदारी झाली नसती, तर पराभवाचं अंतर अधिक वाढलं असतं.

तळाचे तिन्ही बळी महाराजनंच मिळविले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळ करणार्‍या निशमला आठ चेंडूंमध्ये खातंही उघडता आलं नाही. फिलिप्सच्या डावात चार-चार चौकार व षट्कार होते. षट्कार मारणारा तो एकमेव फलंदाज. महाराज (4/46) व यानसेन (3/31) ह्यांना किट्झेनं दोन महत्त्वाचे बळी घेऊन चांगली साथ दिली. डूसेन सामन्याचा मानकरी ठरला. ह्या विजयामुळं द. आफ्रिका गुणतक्त्यात पुन्हा पहिल्या क्रमांकावर गेला. न्यूझीलंडचा हा मोठा पराभव पाकिस्तानच्या आशा पल्लवित करणारा आहे, हे नक्की!

- Advertisment -

ताज्या बातम्या