Saturday, June 7, 2025
Homeअग्रलेखस्त्री-सबलीकरणाचे आदर्श प्रात्यक्षिक!

स्त्री-सबलीकरणाचे आदर्श प्रात्यक्षिक!

स्त्री मुक्ती आणि स्त्री शिक्षणाच्या भारतातील प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 190 वा जयंतीदिन नुकताच साजरा झाला. महिलांसाठी त्यांनी आभाळाएवढे विशाल कार्य केले.

- Advertisement -

त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवून सावित्रीबाईंना देशात सर्वत्र अभिवादन करण्यात आले. स्त्रियांच्या उद्धारासाठी सावित्राईबाईंनी केलेल्या संघर्षाला आणि प्रयत्नांना आता मधुर फळे येत आहेत. सावित्रीबाईंचा वारसा चालवणार्‍या त्यांच्या हजारो-लाखो लेकी, नाती आणि पणत्या वेगवेगळ्या क्षेत्रांत यशाची उत्तुंग झेप घेत आहेत. अगदी अलीकडे अशाच दोन पणत्यांनी आपल्या उजेडाने आभाळ उजळले आहे. आपापल्या पित्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन यशाला गवसणी घातली आहे. एक लेक राजकारणी पित्याची तर दुसरी आहे पोलीस अधिकारी पित्याची!

सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दुसर्‍याच दिवशी लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेतील 89 यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर व्हावी हा योगायोगच! 2019 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्येच जाहीर करण्यात आला होता. उर्वरित उमेदवारांची राखीव यादी आता घोषित झाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओमजी बिर्ला यांची धाकली कन्या अंजली बिर्ला हिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. या यादीत अंजलीने 67 वा क्रमांक मिळवला आहे.

पित्याच्या समाजसेवेने प्रेरित झालेल्या अंजलीने समाजसेवेसाठी सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी पित्याचे पाठबळ आणि थोरली बहीण आकांक्षाचे मार्गदर्शन तिला लाभले. दिल्लीच्या रामजस महाविद्यालयातून तिने राज्यशास्त्रातून पदवी मिळवली आहे. नागरी सेवा परीक्षा हेच ध्येय ठेऊन अंजलीने अभ्यासाला सुरुवात केली. दररोज 10-12 तास अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतले. त्या कठोर परिश्रमाचे चीज झाले आहे. लक्ष्य गाठण्यात ती यशस्वी ठरली. महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याचा मानस व्यक्त करून सावित्रीबाईंना तिने खर्‍या अर्थाने आदरांजली वाहिली आहे.

दुसरी लेक आहे पित्याच्याच खात्यात पोलीस उपअधीक्षकपदी रुजू झालेली वाय. जे. प्रशांती! आंध्र प्रदेशातील पोलीस निरीक्षक वाय. शामसुंदर यांची ही कन्या! लेकीच्या रूपातील वरिष्ठ अधिकार्‍याला अधिकारी पित्याने कडक प्रणाम (सॅल्यूट) केला. लेकीच्या यशाचा एका पित्याला झालेला आनंद आणि अभिमान त्यात प्रतिबिंबित झाला. खाकी वर्दीतील पित्याच्या विशाल मनाच्या प्रत्ययाने कन्या नक्कीच गहिवरली असेल. प्रशांती ही 2018च्या पोलीस सेवा तुकडीतील अधिकारी आहे. गुंटूरच्या ग्रामीण भागात पोलीस उपअधीक्षकपदी तिला नेमणूक मिळाली आहे. लेकीचे नाते घरी; कामावर असताना ती वरिष्ठ अधिकारी आहे, हे भान राखणारा आणि त्यानुरूप वर्तन करणारा कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय पितासुद्धा कौतुकास पात्र ठरतो. लोकसभा अध्यक्षांची मुलगी अंजलीने मिळवलेल्या यशाबद्दल काही जण ‘त्यात काय विशेष? बड्या सत्ताधारी नेत्याची लेक असल्यावर ती यशस्वी होणारच’ अशी छद्मी प्रतिक्रिया व्यक्त करतील. तथापि अंजलीने कठोर मेहनतीतून मिळवलेले हे यश आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही.

प्रेरणास्थान बनलेल्या पित्याने दिलेले प्रोत्साहनसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. प्रशांतीने पित्यापेक्षा मोठा हुद्दा मिळवून पित्याच्या कष्टाचे सार्थक केले आहे. दोन्ही लेकी आणि दोन्ही पिते अभिनंदनास सारखेच पात्र ठरतात. पित्यांमुळेच खरेखुरे स्त्री-सबलीकरण झाले आहे. त्यामुळे यशवंत मुलींचे कौतुक करताना त्यांच्या पित्यांची उपेक्षा करून चालणार नाही. मुलींच्या यशाचे श्रेय पित्यांनाही द्यावेच लागेल. अपत्यांच्या यशाचे श्रेय मातेला देण्याची प्रथा रूढ आहे, पण पित्याचे श्रेयसुद्धा मान्य केलेच पाहिजे. धन्य त्या लेकी आणि धन्य ते पिता !

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या