शिक्षकाची एक छोटीशी कृती आणि त्याला विद्यार्थ्यांनी मनापासून दिलेली साथ समाजात परिवर्तन घडवू शकते, हे बाबरवस्तीने दाखवून दिले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील पांडोझरीमध्ये बाबरवस्ती शाळा आहे. शाळेत मुलांची उपस्थिती नेहमीच कमी असायची. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न शाळेतील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी केला. पालकांमधील व्यसने आणि त्यामुळे होणारी भांडणे हे मुलांच्या गैरहजेरीमागचे मुख्य कारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांची उपस्थिती वाढवायची असेल तर पालक व्यसनमुक्त केले पाहिजेत हे त्यांनी ठरवले. विद्यार्थ्यांना त्यांनी व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले. मुलांबरोबर ते घरोघरी गेले. मुलांनी पालकांकडे व्यसने सोडण्याचा हट्ट सुरु केला. पाच वर्षानंतर आत्ता त्यांच्या प्रयत्नांना फळ आले आहे. वस्तीवरील 40 पेक्षा जास्त कुटुंबे व्यसनमुक्त झाली आहेत. हे शिक्षकांचे आणि त्याबरोबरीने मुलांचे देखील यश आहे. मुलेच शाळेत जात असली तरी शिक्षण किंवा शिकणे मुलांपुरते मर्यादित नसते. मुलांबरोबर पालकांचेही शिकणे व्हायला हवे. गाव शहाणे करण्याची आणि लोकांमध्ये विवेक पेरण्याची जबाबदारी शिक्षकांची असते, असे कोठारी आयोगाचे अध्यक्ष म्हणत. भारतीय शिक्षणपद्धतीचा अभ्यास करुन त्यात बदल सुचवणारा हा पहिला आयोग होता. जो तत्कालीन केंद्र सरकारने नेमला होता. बाबरवस्ती शाळेतील शिक्षकांनी मनावर घेतल्याने काही कुटुंबे व्यसनमुक्त झाली आणि मुलांची शाळा सुरुच राहिली. शिक्षकांनी विद्यादानाचा परीघ विस्तारल्याने परिवर्तन शक्य झाले. ‘तुम्हाला जर कर्त्या माणसांमध्ये बदल घडवायचा असेल तर पहिला आग्रह मुलांचा असला पाहिजे’ असे साने गुरुजी म्हणत. पालक मुलांचा हट्ट पुरा करतात ही पालकांची मानसिकता शिक्षकांनीही लक्षात घेतली. मुलांचे प्रयत्नही कौतुकास्पद आहेत. आम्ही सुरुवातीला पालकांचा मार खाल्ला पण त्यांचे व्यसन सोडवण्याचे प्रयत्न आम्ही सोडले नाहीत, असे काही विद्यार्थ्यांनी माध्यमांना सांगितले. मुले कितीही मोठी झाली तरी त्यांना नेहमीच लहान मानले जाते. तुला काय समजते, असे नेहमीच ऐकवले जाते. समाजात कोणताही प्रसंग उद्भवला तरी मुलांना त्याच्या परिणामापासून दूर ठेवण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची मानली जाते. पण बाबरवस्तीतील मुलांनी मात्र हे गृहितक बदलले आहे. त्यांनी पालकांना बदलले. ग्रामपरिवर्तन आणि दारुबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला. त्याविरुद्ध एल्गार पुकारला. गावागावातील दारुची दुकाने बंद करण्यासाठी लाठीकाठी उगारण्याबरोबरच कायद्याची लढाईदेखील महिला लढतात. त्यात आता मुलेही सहभागी होऊ लागली आहेत. माध्यमात प्रसिद्ध मिळाली म्हणून बाबरवस्ती शाळेविषयी सर्वांना समजले. तथापि राज्याच्या कानाकोपर्यात अनेक शिक्षक असे प्रयत्न करत असतील. करोना काळातही अनेक शिक्षकांनी मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी अभिनव मार्ग शोधले होते. अशा प्रयत्नांची शासनाने देखील दखल घ्यायला हवी. व्यसनमुक्त झालेल्या पालकांच्या हाताला काम देण्यासाठी शासन प्रयत्न करु शकेल. शिक्षकांच्या आणि मुलांच्या मदतीने शासकीय योजना पालकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. या घटनेतून इतरांनाही प्रेरणा घेता यावी यासाठी क्रियाशील शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थांबरोबर संवाद कट्टे आयोजित केले जाऊ शकतात. शिक्षण आणि लोकसहभाग हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. बाबरवस्ती शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी याचे चपखल उदाहरण घालून दिले आहे.