मुंबई –
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे
कायमचे शत्रू नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीनंतर राऊत यांनी शनिवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सुमारे दोन तास चर्चा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली आणि त्यांनी एकत्र जेवण सुद्धा केले.या भेटीच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी रविवारी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट करतानाच, चर्चा करायची असेल तर ती होऊ शकते. आपल्याकडे चर्चेला काही सेन्सारशिप नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा लागत नाही, असे राऊत यांनी सांगितले. फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची भेट ही काही गुप्त नव्हती. ही भेट बंकरमध्ये झाली नाही. बर्याच दिवसांपासून त्यांना भेटण्याचा विचार होता. फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विचार होता असे राऊत यांनी सांगून, फडणवीस यांची भेट ही गुप्त नव्हती. सामनासाठी मुलाखत घेण्यासाठी ही भेट घेतली होती असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सरकार स्थिर – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमचे सरकार पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करणार आहे. आम्हाला शरद पवार यांचे चांगले मार्गदर्शन मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्त्व करत असल्याने फडणवीस यांच्या भेटीतून कोणतेही नवीन राजकीय समिकरण तयार होणार नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले.