मासिक पाळीचे चक्र सुरळीत सुरु राहाणे महिलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी आणि प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. तथापि याच मुद्द्यावर समाजात अनेक गैरसमज आढळतात. या मुद्द्यावर चर्चा करणे महिला आजही समाजसंमत मानत नाहीत. चारचौघीतही मोकळेपणे या विषयावर चर्चा क्वचितच होत असतात. पतीला देखील पत्नीच्या या चक्राविषयी परिपूर्ण माहिती अभावानेच आढळते. किंबहुना तो बायकांचा विषय आहे असाच बहुसंख्य पुरुषांचा ग्रह अनुभवास येतो. पुरुषांनी या विषयात माहिती घ्यावी असे किती महिलांना वाटते? सामाजिक पातळीवर असलेला हा अज्ञानी दृष्टिकोन एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतला. या मुलीचे मासिक पाळीचे चक्र पहिल्यांदाच सुरु झाले होते. तथापि तिच्या भावाने तिच्यावर संशय घेतला. तिचे अनैतिक संबंध आहेत असा आरोप करून तिला जबर मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही अमानुष घटना उल्हासनगर येथे घडली. मासिक पाळीचे चक्र अनेक महिलांसाठी काही अनिष्ट रूढी आणि परंपरांची बेडी बनते. गडचिरोली परिसरात कुरमाघर ही अन्यायकारक प्रथा आजही पाळली जाते. मासिक पाळीचे पाच दिवस गावाबाहेर बांधलेल्या झोपडीत त्या महिलेने एकटीने राहणे म्हणजे कुरमाघर. जिथे झोपडीची सोय नाही तिथे गायीम्हशींच्या गोठ्यात राहावे लागते. या प्रथेमुळे महिलांची अनेक प्रकारची कुचंबणा होते. अनारोग्याचे दुष्टचक्र कायमचे मागे लागते. पोटचे पोर आजारी असले तरी त्याला हात लावायची देखील अशा महिलाना परवानगी नाही. अर्थात या प्रथेबाबत शहर आणि ग्रामीण भाग असा भेद करता येणार नाही. ग्रामीण भागातील महिला झोपडीत राहातात तर अनेक शहरी महिलांना त्यांच्याच घरात चार दिवस एकटीला राहावे लागते आणि शिवाशिव करू नको असे ऐकावे लागते. ही शहरी कुरमा प्रथाच म्हणावी का? मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता पाळा, आहाराची काळजी घ्या आणि आराम करा असे स्त्रीरोग तज्ज्ञ महिलांना बजावतात. तथापि असे वेळापत्रक किती महिलांच्या वाट्याला येते? याची जाणीव तरी किती महिलांना होते? मासिक पाळीच्या दिवसात स्वतःचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धन लक्षात घेत काळजी घ्यायला हवी. हे मुद्दे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाहीत. केवळ या चक्राविषयी भावाला काही माहिती नसल्यामुळे एका अजाण मुलीला जीवाला मुकावे लागले.महाराष्ट्र प्रगतीशील राज्य मानले जाते. त्या राज्यात अशी परिस्थिती भूषणावह नाही. या मुद्द्यावर किती काम करावे लागणार आहे याची यावरून कल्पना यावी. अनिष्ट असल्या तरी रूढी आणि परंपरांचा विळखा सोडवणे वाटते तितके सोपे नाही. कार्यकर्त्यांना संयमाने काम करावे लागते. उदाहरणार्थ कुरमाघर प्रथा नष्ट व्हायला हवी याविषयी दुमत नाही. पण सध्या तरी कुरमाघरे किमान सोयींनी युक्त असावे यावर कार्यकर्त्यांना भर द्यावा लागत आहे. अर्थात ‘हेही नसे थोडके’ हीच कार्यकर्त्यांची भावना आहे. अशा कार्यकर्त्यांच्या मागे पाठबळ उभे करणे हे सरकारचे देखील कर्तव्य आहे.