Saturday, April 25, 2026
HomeनगरAkole : अवैध दारू विरुद्ध संतप्त महिलांचा ‘एल्गार’; दारू वाहून नेणारी गाडीही...

Akole : अवैध दारू विरुद्ध संतप्त महिलांचा ‘एल्गार’; दारू वाहून नेणारी गाडीही पेटवली

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील आदिवासी विभागातील संतप्त महिलांनी अवैध दारू विरुद्ध काल बुधवारी एल्गार पुकारला आहे. घोटी शिळवंडीमध्ये दारू विक्रेत्याला पकडून महिलांनी दारू विक्रेत्यास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान अवैध दारू घेऊन जाणारे चारचाकी वाहनही या रणरागिणींनी पेटवून दिले आहे. राजुर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत अकोले तालुक्यातील राजुर पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घोटी शिळवंडी शिवारातील शिळवंडी फाटा येथे अवैध दारू विक्री करणार्‍या दोघा जणांना ग्रामस्थ व महिलांनी पकडले असल्याची माहिती राजूर पोलीस ठाण्यात समजली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तातडीने पोलीस कर्मचार्‍यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले व पंचांसमक्ष पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
यानुसार पोहेकॉ विनायक कोकणे, पोकॉ एस. आर. शिंदे, पोसई विलास माळोदे, पोहेकॉ वाय. एन. जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अशोक भाऊसाहेब चौधरी( वय 29 रा.आंभोळ, ता. अकोले) याला पकडून संतप्त महिलांनी चांगलाच चोप दिला. पोलीस घटनास्थळी पोहचताच अशोक चौधरी यास संतप्त महिला व ग्रामस्थांनी त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेतील कुंडलीक किसन गंभीरे (50 वर्षे रा.सोमलवाडी, ता. अकोले) हा दुसरा आरोपी याने महिलांचा आक्रमकपणा पाहून तेथून पोबारा केला. हे दोघेही अवैध दारु विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे महिला व ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. यावेळी देशी दारूच्या काही बाटल्या आढळून आल्या आहेत .
पोलिसांनी पंचांसमक्ष घडलेल्या घटनेची माहिती घेत पंचनामा केला व मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेऊन राजूर पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस हवालदार विनायक कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक भाऊसाहेब चौधरी(वय 29 रा. आंभोळ, ता अकोले) व कुंडलीक किसन गंभीरे (50 वर्षे रा.सोमलवाडी, ता. अकोले )या दोघांविरोधात राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारू विक्रीमुळे आमचे प्रपंच उध्वस्त होत आहेत. तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी या घोटी शिळवंडी गावातील महिलांनी राजूर पोलिसांकडे केली आहे.

घोटी शिळवंडी येथे काल दारू वाहतूक करणारी गाडी अडवली. दारू वाहतूक करणार्‍या विक्रेत्याला मारहाण करून त्याची गाडी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. महिलांचे हे कृत्य समर्थनीय नसले तरीही तालुक्यातील महिला किती संतप्त आहेत हे यावरून लक्षात येते.
– हेरंब कुलकर्णी, कार्यकर्ते दारू बंदी आंदोलन समिती

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...