अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील महामार्गालगत असलेले हॉटेल व ढाबे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आले आहेत. विभागाने एप्रिल महिन्यात अवैध हॉटेल्स व ढाब्यांवर विना परवाना मद्यविक्री सेवन करणार्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत जिल्हाभरातून 340 व्यक्तींविरूध्द एकूण 203 गुन्हे नोंदवले गेले आहेत. कारवाईदरम्यान कलम 68 (हॉटेल/ढाबा चालक) व 84 (मद्यपी व्यक्ती) अंतर्गत 69 गुन्ह्यांची नोंद झाली. या मोहिमेत चार लाख 84 हजार 318 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त यांच्या निर्देशानुसार अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम 1 एप्रिल ते 4 मे 2025 या कालावधीत अंमलात आणली गेली. अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी विभागाने जिल्ह्यातील हॉटेल्स, ढाबे आणि अनधिकृत मद्यविक्रीच्या ठिकाणी अचानक छापे घातले. यावेळी बेकायदेशीर मद्य साठा, परराज्यातून आणलेले मद्य, तसेच मद्यसेवन करताना आढळून आलेल्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली.
तसेच, 10 मे रोजी आयोजित लोकअदालत मध्ये या मोहिमेदरम्यान नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी 16 गुन्ह्यांचा निकाल लावण्यात आला. यामध्ये 6 धाबा चालकांवर कलम 68 अंतर्गत, तर 10 मद्यपींवर कलम 84 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी 13 हजार रुपये प्रमाणे एकूण 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम अधीक्षक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून, भविष्यात देखील अशा कारवाया अधिक जोमाने सुरू राहतील, असे अधीक्षक सोनोने यांनी सांगितले.
दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर त्यांच्या परिसरात कुठेही अवैध मद्यविक्री, वाहतूक किंवा हातभट्टी चालवली जात असल्याचे निदर्शनास आले, तर त्यांनी तात्काळ विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत अवैध मद्यविक्री, हातभट्टी/भेसळयुक्त मद्यनिर्मिती, परराज्यातील मद्याची वाहतूक, तसेच बेकायदेशीर स्पिरीट विक्री याविरोधात व्यापक स्तरावर कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत एकूण 955 व्यक्तींविरूध्द 969 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान 39 वाहने जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 कोटी 48 लाख 71 हजार 318 रुपये इतकी आहे.