अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
देशी- विदेशी दारूची वाहतूक केली जात असलेला पिकअप राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नगर- पाथर्डी रस्त्यावर चाँदबिबी महालाजवळ पकडला. 190 बॉक्स दारू व पिकअप असा एकूण 20 लाख 63 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहन नामदेव बडदे (वय 45 रा. खामगाव, काझी गल्ली, जोहरापूर, ता. शेवगाव) व इतर अज्ञात व्यक्तींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. एका पिकअप मधून नगर- पाथर्डी रस्त्यावरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती भरारी पथक क्रमांक एकला मिळाली होती. पथकाने नगर- पाथर्डी रस्त्यावर चाँदबिबी महालाजवळ संशयित पिकअप (एमएच 17 एजी 6653) पकडला. त्याची तपासणी केली असता देशी व विदेशी दारूचे 190 बॉक्स मिळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे सह आयुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त सागर धोमकर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक सुरज कुसळे, निरीक्षक कुमार ढावरे, निरीक्षक बाबुराव घुगे, दुय्यम निरीक्षक अरुण खाडे, दुय्यम निरीक्षक आनंद जावळे, दुय्यम निरीक्षक गहिनीनाथ नागरगोजे, विनोद रानमाळकर, जवान सुरज पवार, दिनेश खैरे, खाडे यांच्या पथकाने केली आहे. तपास निरीक्षक कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली जावळे करत आहेत.