Saturday, January 24, 2026
Homeनगरअवैध धंद्यांसह अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करा - आ. खताळ

अवैध धंद्यांसह अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करा – आ. खताळ

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरात सुरू असणारे अवैध धंदे आणि अनधिकृत कत्तलखान्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असा प्रश्न निर्माण करणार्‍या विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस अधिकार्‍यांनी करावे. तसेच शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून अनधिकृत चालणारे सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करावे, असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका व घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांना दिले.

- Advertisement -

संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृहावर संगमनेर शहर, तालुका, घारगाव या तीनही पोलीस ठाण्यातील गुन्हेगारीबाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आणि घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player

यावेळी आमदार खताळ म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी शहरात सुरू असणारे सर्व अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते. पोलिसांनी मागील आठवड्यात तीन ते चार ठिकाणी कत्तलखान्यांवर कारवाया केल्या आहेत. यापुढे अशा ठिकाणी निदर्शनास आल्यावर ज्या हद्दीत असतील तेथील प्रशासनाने, नगरपालिका प्रशासनाने नोटिसा देऊन अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावे. तसेच शहरात मटका, जुगार, अवैध दारू, अंमली पदार्थ, गुटखा, ऑनलाईन लॉटरी हे सर्व अवैध धंदे बंद करावे. अवैध धंदे करणारे कोणीही असो त्यांचा बंदोबस्त करावा.

अवैध धंद्यांना कुठल्याही प्रकारचे पाठबळ दिले जाणार नाही असे आमदार खताळ यांनी ठणकावून सांगितले. शहर, तालुका आणि घारगाव या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब तसेच बेकायदेशीर चक्री, ऑनलाईन लॉटरी सुरू आहे, त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना दिल्या. याचबरोबर पोलीस स्थानकामध्ये आलेल्या तक्रारदारांबरोबर कर्मचार्‍यांचे वर्तन सभ्यपणाचे असावे, उध्दटपणे वागू नये असे सांगितले.

प्रभारी अधिकार्‍यांकडून घेतला आढावा…
संगमनेर तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आत्तापर्यंत किती घरफोड्या, चोर्‍या, सोनसाखळी चोरी झाल्या आहेत. यातील दाखल गुन्ह्यांपैकी किती गुन्हे उघडकीस आले आणि किती आले नाही याबाबतचा सविस्तर आढावा तीनही पोलीस ठाण्याच्या प्रमुखांकडून घेण्यात आला. तसेच मागील आठवड्यात अकोले नाका येथे काही अवैध धंदे करणार्‍या व्यक्तींनी मारहाण केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. ते पुन्हा असे कृत्य करणार नाही यासाठी वेळप्रसंगी त्यांची गावातून धिंड काढावी. कत्तलखान्याच्या चालक-मालकांवर वारंवार गुन्हे दाखल होऊन कारवाया केलेल्या आहेत. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी या कलमाखाली कारवाई करून तडीपार करण्याबाबतही आमदार अमोल खताळ यांनी सूचना दिल्या.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...