Saturday, June 15, 2024
Homeनगरपारनेर शहर, तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पारनेर शहर, तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

पारनेर शहरासह तालुक्यातील विविध गावात अवैध दारू, गुटखा विक्री, ऑनलाईन लॉटरी, बिंगो, मटका, वाळू तस्करी, अवैध प्रवासी वाहतूक, बेकायदा खरेदी-विक्री यासारखे अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. तालुक्यात दोन पोलीस ठाण असतानाही अवैध धंदेचालक शिरजोर झाले आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

तालुक्यात टाकळी ढोकेश्वर, निघोज, भाळवणी, अळकुटी सह छोट्या-मोठ्या गावांतून अवैध व्यवसायांची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. तालुक्यातून अहमदनगर – पुणे व अहमदनगर – कल्याण असे दोन महामार्ग जातात. या महामार्गांच्या कडेने असणारे हॉटेल, ढाबे हे अशा अवैध धंद्यांचे केंद्र बनत आहेत. वाहनांमधील डिझेल चोरून विक्री, साहित्याची चोरी, वाहने अडवून लूटमार, असे प्रकार यातून वाढत आहेत.

तरुणाई कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या नादात या अवैध धंद्यांना बळी पडत आहे. त्यांचा गैरफायदा घेत राजकीय आश्रय मिळवून अनेक गावगुंडांनी आपले व्यवसाय दुर्गम गावापर्यंत वाढवले आहेत. मोठ्या प्रमाणावर युवक यशाचा शॉर्टकट गाठण्यासाठी कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमविण्याच्या नादात ऑनलाईन बिंगो, मटका, जुगार अशा जाळ्यात अडकले आहेत. यातून अवैध सावकारांकडून चार ते पाच टक्के व्याजाने कर्ज घेऊन अनेक युवक कर्जबाजारी झाले आहेत.

ते पैसे जुगारात हरल्यावर तरुणांना सावकाराच्या पठाणी वसुलीला सामोरे जावे लागत आहे. त्यातून कर्जबाजारीपणा व तरुणांची व्यसनाधीनता वाढली आहे. हे जुगार खेळण्यासाठी तसेच नशा करण्यासाठी तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचे दिसून येत आहे. तर काहींनी आत्महत्यासारखे पर्याय निवडले आहेत. तालुक्यातील अवैध धंदे मुळासकट उखडून टाकावित, अशी मागणी पारनेर तालुक्यातील सजग नागरिक करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या