अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एकाच दिवशी जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत जुगार, अवैध दारू विक्री आणि गुटखा विक्रीप्रकरणी एकूण 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन लाख तीन हजार 339 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदारांची पाच पथके तयार केली. या पथकांना अवैध व्यवसायांची माहिती काढून संबंधित ठिकाणी छापे टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी (13 नोव्हेंबर) कर्जत, तोफखाना, राहुरी, पारनेर आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. यात जुगार अड्ड्यांवर तीन ठिकाणी कारवाई करून एक लाख 27 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध दारू विक्रीप्रकरणी 12 ठिकाणी छापे टाकून 62 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर गुटखा विक्रीप्रकरणी कर्जत येथे एका ठिकाणी कारवाई करून 13 हजार 329 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस ठाणेनिहाय कारवाईत कर्जत येथे जुगाराचा एक, दारू विक्रीचे दोन आणि गुटखा विक्रीचा एक, तोफखाना येथे जुगाराचा एक, पारनेर येथे जुगाराचा एक व दारू विक्रीचे चार, राहुरी येथे दारू विक्रीचे तीन, तर लोणी येथे दारू विक्रीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, प्रताप देवकाते, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, अजिनाथ पाखरे, सुयोग सुपेकर, संतोष खैरे आदींच्या पथकाने या कारवाया केल्या आहेत.




