अहिल्यानगर (प्रतिनिधी)
सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पोलीस विभागाच्या १२ एकर जागेच्या काही गुंठ्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) ‘ताबेमारी’ करत तेथे ‘आरंभ’ नावाची ६० फ्लॅटची एक इमारत (सदनिका) उभी केली. हा सर्व प्रकार पोलीस विभागाने भूमी अभिलेख मार्फत केलेल्या मोजणीतून समोर आणून अतिक्रमण काढण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे.
मात्र पोलिसांच्या जागेवर ‘ताबेमारी’ करण्याची हिंमत करणाऱ्या बिल्डरने चक्क पोलिसांकडून केली जात असलेली कार्यवाहीच चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्याने फ्लॅट धारकांना पत्र काढून पोलिसांकडून ‘आरंभ’ इमारतीच्या अतिक्रमणाबाबत कार्यवाही केली जात आहे ती चुकीचे आहे व त्या कार्यवाहीस प्रतिउत्तर देण्यास आम्ही वचनबध्द आहोत, असे आश्वासन दिले आहे.
पोलीस विभागाच्या १२ एकर जागेतील सुमारे २५ ते ३० गुंठ्यांत ‘ए टू झेड’ कन्ट्रक्शनचे झोएब खान व अभिजित देवी यांनी ‘आरंभ’ नावाने ६० फ्लॅटची इमारत उभी करून त्याची विक्री केली आहे. तसेच त्या लगतच गुरूदत्त बंग्लोज नावाने नंदकुमार कासार व राजेंद्र बेरड यांनी चार रो बंगलो उभे करून त्याची विक्री केली आहे. यामध्ये राहणाऱ्या लोकांना सदरची इमारत व बंगले अतिक्रमीत असल्याचे लक्ष्यात येताच त्यांची झोप उडाली आहे. पोलीस विभागाने सुरूवातीला भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून घेतल्यानंतर हद्द निश्चिती केली आहे.
त्याठिकाणी पोल रोवण्यात आले आहेत. दुसरीकडे फ्लॅट व बंगल्यात राहणा-यांना नोटीस काढून ते ३० दिवसांत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे रहिवाशी लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘आरंभ’ इमारतीमधील फ्लॅट धारकांनी आम्हाला आमचे पैसे परत करावेत, अशी मागणी बिल्डरकडे केली आहे. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ती जागा पोलीस विभागाची असतानाही बिल्डरने त्याठिकाणी इमारत उभी करून त्यातील फ्लॅटची सर्वसामान्य लोकांना विक्री करून फसवणूक केली, अशी भावना फ्लॅट धारकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ए टू झेड’ कन्स्ट्रक्शनने फ्लॅट धारकांच्या नावाने एक पत्र काढले आहे. त्यात त्याने म्हटले आहे, पोलिसांकडून आरंभइमारतीच्या अतिक्रमणबाबत कार्यवाही केली जात आहे ती चुकीची आहे व त्या कार्यवाहीस प्रतिउत्तर देण्यास आम्ही वचनबध्द आहोत. कोणीही घाबरून जायची गरज नाही. आम्ही त्यांच्या विरोधात (पोलिसांच्या) जे काही पुढील कार्यवाही करायची आहे ती आम्ही सुरू केलेली आहे. पोलिसांकडून आलेली नोटीस आमच्याकडे सुपूर्त करावी. त्यावरील पुढील कार्यवाही आम्ही करू. न्यायालयीन प्रक्रियेची पूर्ण जबाबदारी ही आमची राहणार आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबविली जात आहे. आमचे वकील आणि कायदेशीर सल्लागार या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि आपल्याला आवश्यक ते सहकार्य प्रदान करण्यास आम्ही वचनबध्द आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे आहे. याबाबत तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याची ग्वाही आपणास देतो, या सर्व कायदेशीर कार्यवाहीतून आम्ही नक्कीच आपणास सर्वांना बाहेर काढू ही खात्री आम्ही देऊन इच्छितो. गैरसमज किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदेशीर प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आपल्या विरोधात आल्यास त्याची संपूर्ण भरपाई देण्याची जबाबदारी ही आमची असेल, असे देखील पत्रात नमूद केले आहे.
न्यायालयात जाण्याची तयारी
बिल्डरने पोलिसांच्या जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी इमारत उभी केली, त्यातील फ्लॅट सर्वसामान्य लोकांना विक्री करून त्यांची फसवणूक केली आहे. आता पोलिसांकडून केली जात असलेली कार्यवाही चुकीची असल्याचे बिल्डरचे म्हणणे आहे. यामुळे फ्लॅटधारकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी शंका काही फ्लॅटधारकांनी उपस्थित केली आहे. दुसरीकडे हा सर्व प्रकार न्यायालयात घेऊन जाण्याचे आणि तेथे अपयश आले तर नंतर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन बिल्डरने सर्व फ्लॅटधारकांना दिले आहे. मात्र सध्या तरी फ्लॅटधारकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. बिल्डरने न्यायालयात जाण्यापेक्षा आम्हाला पैसे द्यावे, अशी मागणी देखील फ्लॅटधारकांनी केली आहे.
बिल्डरवर गुन्हा दाखल करा – अॅड. लगड
बांधकाम व्यावसायिकाने पोलीस विभागाच्या जागेत इमारत उभी करून त्यातील फ्लॅट व बंगल्याची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या सदनिकाधारकांनी पोलिसांकडे जाऊन फसवणुकीची फिर्याद देणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलीस देखील कायदेशीर फिर्याद देऊ शकतात. कारण यामध्ये सदनिकाधारकांबरोबर पोलिसांची देखील बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केली आहे. पोलीस दलाच्या जागेवर दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकाने अतिक्रमण करून इमारत उभी केली, आता क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी स्वतः हुन फिर्यादी व्हावे. तसेच सदनिकाधारकांनीही फिर्याद द्यावी, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी केली आहे.