Saturday, June 15, 2024
Homeनगरअवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; तिघांविरूध्द गुन्हा

अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; तिघांविरूध्द गुन्हा

आयजी पथकाची सावेडीत कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने अनेक दिवसांनंतर नगर शहरात अवैध धंद्यावर कारवाई केली. सावेडीच्या कुष्ठधाम रस्त्यावरील सोनानगर चौक येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून गॅस भरण्याचे मशीन, रिक्षा, गॅस टाक्या असा एक लाख पाच हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शकील शेख यांनी फिर्याद दिली आहे. संकेत दत्ता शिंदे (वय 20 रा. वैदूवाडी, सावेडी), तुषार गुलाब सोनवणे (वय 30 रा. सम्राटनगर, वडगाव रस्ता, एमआयडीसी, नागापूर), महंतप्पा कल्लप्पा चांदकोटी (वय 61 रा. फकीरवाडा, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांना माहिती मिळाली की, संकेत शिंदे हा हस्तकांमार्फत अनधिकृतरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस रिक्षामध्ये रिफिलिंग करून देत आहे. निरीक्षक जाधव यांनी पथकातील अंमलदार व पंचासमक्ष सदर ठिकाणी शनिवारी छापा टाकला असता सोनानगर चौकात टपरीसमोर रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून तीन व्यक्ती प्रेशर पंपाच्या सहाय्याने रिक्षाच्या टाकीत गॅस भरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत साहित्य जप्त केले आहे. दरम्यान संकेत शिंदे याच्याविरूध्द 23 मार्च रोजी तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. डायल 112 नंबरवर यासंदर्भात तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्याने पुन्हा धंदा सुरू केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या