Tuesday, October 20, 2026
Homeक्राईमShrirampur : अवैध गुटखा-मावा विक्रेत्यांविरुद्ध एलसीबीची धडक कारवाई

Shrirampur : अवैध गुटखा-मावा विक्रेत्यांविरुद्ध एलसीबीची धडक कारवाई

सोनई, नेवासा, कोपरगाव, राहुरी व श्रीरामपूरात एकाचवेळी 9 ठिकाणी छापे || 17 जणांविरुद्ध गुन्हे, 1 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक मोहीम राबवित, मोठी कारवाई केली. सोनई, नेवासा, कोपरगाव तालुका, राहुरी आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी नऊ ठिकाणी छापे टाकून 17 आरोपींविरुद्ध नऊ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत तब्बल 1 लाख 81 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्वतंत्र पथके तयार करून गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूची अवैध निर्मिती व विक्री करणार्‍यांची माहिती संकलित केली.

- Advertisement -

त्यानंतर 12 व 13 सप्टेंबर रोजी पथकांनी सोनई, नेवासा, कोपरगाव तालुका, राहुरी तसेच श्रीरामपूर शहर परिसरात कारवाईचा धडाका लावला. या कारवाईदरम्यान अवैधरीत्या गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू तयार करून विक्री करणार्‍यांविरुद्ध नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन कारवायांमध्ये राहुल कचरू धनवटे, संदीप जनार्धन शिंदे, लियाकत राजू शेख यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एका प्रकरणात सद्दाम जहागीरदार हा संशयित फरार आहे. या कारवायांत एकूण 55 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नेवासा येथे सागर रामभाऊ आलवणे याच्यावर कारवाई करून 3 हजार 162 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तात्रय संपत गायकवाड याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातील तनवीर शेख हा फरार आहे. या कारवाईत 20 हजार 606 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुरी परिसरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये शफीक अब्दुलकादर शेख, मनोज खंडुजी कळमकर, वैभव सुभाष कोकाटे आणि याकुब मुकंदर पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवायांत अनुक्रमे 44 हजार व 33 हजार 968 रुपये, असा एकूण 77 हजार 968 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील शशीकांत रामदास मगर हा संशयित फरार आहे.

श्रीरामपुरात दोन ठिकाणी कारवाई
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या कारवाईत चैतन्य सुनिल परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून 7 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील संजु परदेशी हा फरार आहे. दुसर्‍या कारवाईत गौरव विनायक नाईक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 15 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अजीम सय्यद व शोहेब शेख हे दोघे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व कारवायांमध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274, 275 तसेच लागू प्रकरणांत कलम 3(5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली. जिल्ह्यातील अवैध गुटखा-मावा विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळातही अशा कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...