अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई सुरू केली असून, एकाच दिवशी नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 16 जणांविरूध्द सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूसह एकूण एक लाख 37 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काही आरोपी पसार असून, एका प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग आढळून आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यातील गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेंतर्गत पथकांनी नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. पंचांसमक्ष सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेला मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत गळनिंब येथील अल्ताफ सुभानभाई शेख (वय 39) दुसर्या कारवाईत पाचेगाव येथील कानिफनाथ कर्नासाहेब तुवर (वय 26) तिसर्या कारवाईत अल्पवयीन मुलाचा समावेश असून, अस्लम गणीभाई तांबोळी हा पसार आहे. या सर्वांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत शहाजी छबन काळे (वय 46, रा. म्हसणे), योगेश दत्तात्रय पवार (वय 21, रा. सुपा) आणि बबन बांडे (रा. टाकळी ढोकेश्वर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. जवळा परिसरातील रोहिदास जगन्नाथ कोयते (वय 36), फिरोज चाँद इनामदार (वय 48) यांच्यासह आबिदा चाँद इनामदार (तिघे रा. जवळा), मनोहर बडे आणि निघोज येथील मुन्नाभाई (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या कारवाईत निघोज येथील अविनाश बाळासाहेब लंघे (वय 32), विशाल तुकाराम गाडीलकर (वय 27) आणि रोहित पंढरीनाथ कोल्हे (वय 30) यांच्यासह सत्यम वरखेडे (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.




