संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर (Sangamner) तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात (Illegal Minor Mineral Transportation) महसूल विभागाने पुन्हा एकदा आपली कडक भूमिका राबवली आहे. कोल्हेवाडी फाटा तसेच रहिमपूर शिवारातून परवानगीशिवाय मुरूम (Murum) व वाळूची (Sand) वाहतूक करणारी चार वाहने महसूल पथकाने (Revenue Squad) पहाटेच्या सुमारास पकडली. बुधवारी (ता. 24) पहाटे ही धडक कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेली सर्व वाहने पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या (Municipal Council Election) पार्श्वभूमीवर अनेक प्रशासकीय अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत काही मुरूम व वाळू तस्करांनी पुन्हा एकदा अवैध वाहतूक सुरू केली होती. प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार धिरज मांजरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महसूल विभागाच्या (Revenue Department) विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. मंडळ अधिकारी अमृत हिले, मच्छिंद्र राहाणे, रवींद्र पानसरे, सूर्यकांत रणशूर, अभिषेक गोर्डे आदी अधिकार्यांनी कोल्हेवाडी फाटा व रहिमपूर परिसरात सापळा रचत संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान अवैधरित्या मुरूम व वाळू भरून वाहतूक करणारी चार वाहने रंगेहाथ पकडण्यात आली. तपासणीअंती या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुरूम तसेच वाळू आढळून आली.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील गौणखनिज तस्करांचे (Minor Mineral Smuggler) चांगलेच धाबे दणाणले असून, अवैध वाहतुकीत सहभागी असलेल्या घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तहसीलदार धिरज मांजरे यांनी यापूर्वीही अनेक वेळा अवैध वाळू व मुरूम वाहतुकीवर कठोर कारवाया केल्या असून, नियम तोडणार्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. जप्त (Seized) करण्यात आलेली चारही वाहने सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली असून, त्यांच्यावर महसूल नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
या वाहनांवर किती दंड आकारला जातो, तसेच संबंधित चालक व मालकांवर कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे संगमनेर (Sangamner) तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्याची शक्यता असून, प्रशासनाच्या या ठोस भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.




