अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171 मध्ये बेकायदेशीर मुरूम उत्खनन करताना वन विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान एका महिला वनरक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहरे वन परीक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राजश्री जगन्नाथ राऊत (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. हर्षल शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शिंगवे नाईक, ता. अहिल्यानगर), अंकुश जाधव (पूर्ण नाव माहिती नाही, रा. देहरे, ता. अहिल्यानगर) व दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (27 एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहरे वन परीक्षेत्रात कार्यरत वनरक्षक राजश्री राऊत यांना गस्तीदरम्यान आढळून आले की, काही व्यक्ती बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन करत आहे. त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तींकडे उत्खननाबाबत परवाना आहे का, याची विचारणा केली असता संशयित चौघांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला.
त्यांनी एक क्रमांक नसलेला डंपर आणि एक क्रमांक नसलेला जेसीबी यांचा वापर करून मुरूम चोरी करत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक राजश्री राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.