राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी येथील मुळानदी पात्रातून अवैध वाहतूक करण्यार्या वाहन चालकाला वाहनासह अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 12 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणार्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अनिस निसार शेख व त्याचा साथीदार हे राहुरी येथील मुळानदी पात्रामधून अवैध वाळू टेम्पोमध्ये भरून ती सोनई फाटा, राहुरी येथून शनिशिंगणापूर रस्त्याने जाणार आहेत.
पथकातील पोलीस अंमलदारांनी तात्काळ पंचासमक्ष सोनई फाटा, राहुरी येथे जाऊन सापळा रचून वाळूने भरलेला टेम्पो मिळून आल्याने, टेम्पो थांबवून चालक राहुल अभिमान शिंदे यास ताब्यात घेतले. ताब्यातील टेम्पो व वाळुबाबत माहिती विचारली असता त्याने सदरचा टेम्पो हा अनिस निसार शेख व युनूस निसार शेख यांच्या मालकीचा असून त्यांच्या सांगण्यावरून वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती दिली. आरोपीकडे वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याने पंचासमक्ष 5 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा विना क्रमांकाचा टेम्पो व 20 हजार रुपये किमतीची 2 ब्रास शासकीय वाळू असा एकूण 5 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चालक राहुल अभिमान शिंदे (वय 26) रा. राहुरी, , अनिस निसार शेख (फरार) व युनूस निसार शेख (फरार) दोन्ही रा.राहुरी खुर्द या तीन आरोपींविरूध्द गु.र.नं. 22/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.