Thursday, January 29, 2026
HomeनगरShrirampur : अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई ऐवजी महसूलकडून शेतकर्‍यांना नोटीसा

Shrirampur : अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई ऐवजी महसूलकडून शेतकर्‍यांना नोटीसा

नोटीसा त्वरीत मागे घ्याव्यात || गोदावरी काठच्या नायगाव मधील शेतकर्‍यांची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील नायगाव शिव रस्त्यावरून होत असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रक चालकाविरुद्ध कारवाई न करता 11 शेतकर्‍यांना नोटीसा बजावल्या. याबाबत शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त करून महसूल खात्याच्या नोटीसीला उत्तर देवून दिलेली नोटीस त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान येथील महसूल खात्याने चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याची प्रतीक्रिया या शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

या संदर्भात येथील शेतकर्‍यानी आमदार हेमंत ओगले व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी 20 जून 2025 रोजी नायगावच्या काही शेतकर्‍यांना नोटीसा बजावल्या आहेत. मंडलाधिकारी उंदिरगाव, गाव महसूल अधिकारी नायगाव, ता. श्रीरामपूर यांच्या 19 जून 2025 च्या अहवालावरून ही नोटीसीची कारवाई कवण्यात आली आहे. अहवालामध्ये नायगाव क्षेत्रातील शेती गटाचे नजीक गोदावरी नदीचे पात्र आहे. नदीपात्रातून अवैध वाळूचे उत्खनन करून गट नं. 363 क्षेत्र 1.15 मधून जात असलेल्या रस्त्याने अवैध वाळूची वाहतूक होत आहे.

YouTube video player

या अहवालावरून वरील गट नंबरमधील शेतकर्‍यांना अनाधिकृत वाळू वाहतूक रस्त्यावरून बंद करावी, अन्यथा महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7), (8) नुसार अनाधिकृत गौण खनिज वाहतुकीस प्रोत्साहन देत असल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नायगावच्या 11 शेतकर्‍यांनी या नोटीसीस रितसर उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही शेतकरी खासगी शेत रस्त्याचा वापर शेतीकामासाठी करतो. या रस्त्याचा वाळू तस्करांकडून वाळू वाहतुकीस गैरवापर होत असेल तर त्यांच्याशी आमचा संबंध नाही आणि आमची संमती असल्याचे कारण नाही. अवैध वाळू वाहतूक रोखणे आणि ट्रक चालकावर कारवाई करणे ही शासन व पोलिस खात्याची जबाबदारी आहे. आम्ही वाळू वाहतूक रोखली तर ट्रक अंगावर घालण्याचे प्रयत्न होतात. यापूर्वीही गामस्थांनी निवेदन देऊन समक्ष भेटून ट्रक चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ट्रक चालकावर कारवाई न करता रस्त्यावरील शेतकर्‍यांना नोटीसा बजावून कारवाई करणे हे अन्यायकारक आहे. शेतकर्‍यांना गुन्हेगार ठरविणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. अवैध वाळू ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करणे ही पोलीस व महसूल खात्याची जबाबदारी आहे. नायगावचे शेतकरी गोरख लांडे, कैलास लांडे, कार्तिक लांडे, भाऊसाहेब ठोंबरे, सुभाष निवृत्ती ठोंबरे, नवनाथ निवृत्ती ठोंबरे, रमेश ज्ञानेश्वर ठोंबरे, सुरेश ज्ञानेश्वर ठोंबरे, मंदाकिनी वसंत इंगळे, गोविंद दातीर, उत्तर बोर्डे आदींच्या स्वाक्षरीने तहसीलदारांच्या नोटीसीला 18 जुलै 2025 रोजी रितसर उत्तर देण्यात आले आहे. या संदर्भात शेतकर्‍यांनी काल शनिवारी आ. हेमंत ओगले व करण ससाणे यांची समक्ष भेट घेऊन तहसीलदारांच्या नोटीसीची माहिती दिली.

यात एका 75 वर्षाच्या महिलेला देखील नोटीस आल्याचे सांगितले. यावेळी शेतकर्‍यांचे वतीने नायगावचे शेतकरी राजेंद्र पवार यांनी बाजू मांडली. आ.ओगले यांनी तहसीलदार वाघ यांना फोन करून शेतकर्‍यांना नोटीस का काढल्या? वाळू वाहतूक करणारांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल खाते व पोलिस खात्याची आहे. शेतकर्‍यांना काढलेल्या नोटीसा रद्द करा, असे सांगितले, त्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असल्याचे सांगितले. दरम्यान आ. ओगले यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून शेतकर्‍यांवर होत असलेल्या चुकीच्या कारवाईची माहिती दिली. त्यांनी तहसीलदारांना याबाबत सूचना देऊन कोणतीही कारवाई करू नका, अशी सूचना देत असल्याचे आश्वासन दिले आहे.

..नाही तर शेतकर्‍यांना बंदुकीचे लायसन्स द्या
शासन अवैध वाळू वाहतूक रोखू शकत नसेल, तर ती बंद करण्यासाठी आम्हाला बंदुकीचे लायसन्स द्यावे, तहसीलदारांनी चोर सोडून संन्याशाला शिक्षा हा प्रकार थांबवून शेतकर्‍यांना दिलेली नोटीस मागे घ्यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ.ओगले यांच्याशी चर्चा करताना शेतकर्‍यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...