संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल करणार्या आरोपींविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा दाखल करुन 33 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणार्या ठिकाणांची व कत्तल करुन गोमांस विक्री करणार्या इसमांची माहिती काढून कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ यांचे पथक तयार करुन त्यांना संगमनेर (Sangamner) शहरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणार्या इसमांची माहिती काढून कारवाईसाठी रवाना केले. हे पथक शुक्रवारी रात्री शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी गल्ली क्रमांक 7, जुना जोर्वे रस्ता येथील न्यू सेवा सॉ मिल समोरील वाड्यात मुदस्सर अब्दुल करीम कुरेशी हा इतर दोन साथीदार आणि त्यांच्या हस्तकामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असताना देखील कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे आणून त्यांची कत्तल (Slaughter) करत असल्याची माहिती मिळाली.
यानंतर पथकाने मदतीकरीता तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेरमधील पोलीस अंमलदार बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे, सुनील ढाकणे यांना बोलावून घेत वरील ठिकाणी खात्री केली असता काही इसम गोवंश जनावरांची कत्तल केलेले गोमांस वाहनामध्ये भरत असल्याचे दिसून आले. तेव्हा पोलिसांची चाहूल लागताच मुदस्सर अब्दुल करीम कुरेशी, वाहिद अब्दुल करीम कुरेशी, अक्रम अहमद कुरेशी (तिघे रा. भारतनगर, संगमनेर), शहबाज गुलाम हुसेन शेख (रा. पुणे-नाशिक रस्ता, नाईकवाडापुरा, संगमनेर) हे चौघेही फरार झाले. तर आदित्य राजेंद्र जाधव (रा.526, जिल्हा परिषद शाळेजवळ भोईदपाडा, गोखिवरे वसई पूर्व, पालघर) हा मिळून आला.
सदर ठिकाणावरुन 18 लाख रुपये किमतीचे 6 हजार किलो गोमांस (Beef), 12 लाख रुपये किमतीचे दोन पिकअप वाहन, 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे 9 जिवंत गोवंश जनावरे, एक हजार रुपये किमतीचे 2 सुरे, एक कुर्हाड असा एकूण 33 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील सर्व आरोपींविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.





