अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाणीयोजना अवलंबून असलेल्या जलस्रोतांच्या 1 किमी. परिघात पाणी उपशावर जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली असून असा अवैध पाणी उपसा होत असल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तालुकानिहाय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी श्रीगोंदे तालुक्यात गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या ममाध्यम संवादफ कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ही माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त उमेश पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर आरडकर उपस्थित होते. जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर 2026 ते जून 2027 कालावधीसाठी 1110 गावे 5 हजार 234 वाड्यांकरता 3 हजार 887 उपायोजनांचा संभाव्य टंचाई आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून आराखडा अंदाजीत 470 कोटी रुपये रकमेचा आहे. सध्या परिस्थितीत टंचाईग्रस्त 208 गावे व 1230 वाड्यांसाठी 220 टँकरद्वारे 4 लाख 12 हजार 892 लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे.
आता यामध्ये जनावरांची संख्या गृहीत धरून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले. टँकर भरण्यासाठी व पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण संभाव्य 150 उद्भवांचे स्रोत नियोजित करण्यात आले असून यामध्ये एमआयडीसीमधील 1, सार्वजनिक विहिरी व कुपनलिका 134, टँकर फीडिंग पॉईंट 8, जलशुद्धीकरण केंद्र 47 याचा समावेश आहे. टँकरचे पाणी गावामध्ये टाक्यांमध्ये भरले जाणार आहे. अशा 163 गावांमध्ये टाक्या खरेदी करण्यासाठी 4.43 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जलजीवन मिशन तसेच पाणीपुरवठा करणार्या ज्या योजनांची कामे 75 ते 99 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाली आहेत, अशा जिल्हा परिषद कडील 413 व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील 52 योजना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
या व्यतिरिक्त 50 गावांसाठी 53 तात्पुरत्या स्वरूपात योजना तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी 50 कोटी 58 लाख रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी राज्य सरकारकडे मागणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने पाणी योजना पूर्ण केल्या परंतु तेथे टँकर सुरू करावे लागले अशी 85 गावे आहेत तर अशाच स्वरूपातील ममजीप्राफकडे 95 गावे आहेत. जिथे टँकर भरले जातात अशा ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा उभी करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामध्ये राक्षी व अमरापूर (शेवगाव), मांदळी व दुरगाव (कर्जत) व पांढरी पूल (नगर) येथील टँकर पॉईंटचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
परराज्यातून चारा उपलब्ध करण्याचा विचार
सध्या दीड ते दोन महिने पुरेल इतकाच चारा जिल्ह्यात शिल्लक आहे. पारनेर, पाथर्डी, नगर व जामखेड या चार तालुक्यातील 41 मंडलांमध्ये चारा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्या 2 लाख 30 हजार 357 शेतकर्यांच्या 1 लाख 53 हजार 652 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी चारा उत्पादन घेतले जाणार आहे. फेब्रुवारी-मार्चनंतर चार्याची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाहेर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडे संपर्क करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.




