मुंबई । Mumbai
मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून केरळात ३१ मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल कोकणच्या दिशेने सुरू होते. त्यानंतर तो महाराष्ट्रात इतरत्र पसरतो. महाराष्ट्रातही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनास पूरक वातावरणाची निर्मिती होत असून, पुढच्या पाच दिवसांमध्ये मान्सूनच केरळात दाखल होणार आहे. याशिवाय हे मोसमी वारे अरबी समुद्रातील दक्षिणेपासून, मालदीवचा उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्राचं दक्षिण पश्चिम क्षेत्रही व्यापतील. ज्यामुळं केरळच्या काही भागांसह, बंगालच्या उपसागराचा पुर्वोत्तर भाग, देशातील पुर्वोत्तर राज्य आणि लक्षद्वीपमधील काही क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या दमदार हजेरीची चिन्हं आहेत.
हे ही वाचा : शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य धादांत खोटं; अजित पवारांचा काकांवर पलटवार
दरम्यान, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. आयएमडीने काल दिलेल्या सुधारित अंदाजानुसार, यंदा भारतात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रातही मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
मागील वर्षी ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. सर्वसामान्यपणे मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा : रुग्णवाहिकेची एसटी बसला धडक
यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र, यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चक्रीवादळाची तीव्रता कमी
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या किनारपट्टी भागासह पश्चिम बंगालला धडकलेल्या रेमल चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत असून, हे वादळ ताशी १५ किमी इतक्या वेगानं उत्तरेकडे पुढे सरकत असून, त्याची तीव्रता आता आणखी कमी होत जाणार आहे. इतकंच नव्हे, तर या चक्रीवादळाचं रुपांतर आता कमी दाबाच्या पट्टचामध्ये होणार आहे.