मुंबई | Mumbai
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने लावली आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वातावरणात हवापालट होत आहे. बंगालच्या खाडीत देखील कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
हवामान विभागाने अवकाळी पावसाबाबत काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचे अलर्ट जारी केले आहेत.
राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुण्याला ही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईमध्ये पुढील ४८ तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईत वातावरणात बदल पहायला मिळाला आहे. जोरदार पावसाची शक्यता नसली तरी वातावरण बदलामुळे आणि हलक्या सरींमुळे उकाड्यापासून नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागानुसार, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि धुळे जिल्ह्यात १ आणि २ तारखेला येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येऊ शकतो. शेतकऱ्यांसह सामान्य लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला १ ते ३ एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ३० ते ४० किमी प्रतितास असा असण्याची शक्यता आहे, तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवापालट पुढचे पाच दिवस पाहायला मिळणार आहे. तसेच काही भागात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुढच्या ४८ तासात मराठवाड्यात ३८ ते ४५ डिग्री तापमान राहील. विदर्भात मागच्या २४ तासात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याचबरोबर बुधवारी यलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. तर पुणे शहरात आज पावसाची शक्यता आहे. शहर आणि जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. शहरात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला असून दररोज दुपार नंतर ढग भरून येत असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा