अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडीतील हिंन्दुत्व चौक, तपोवन रस्ता या परिसरात दोन परप्रांतीय तरूणांकडून गांजा, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा एकूण 83 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तोफखाना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोन परप्रांतीय इसम हिंन्दुत्व चौकात गांजा व देशी कट्टा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच सोमवारी (14 जुलै) दुपारी 3.10 च्या सुमारास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, नायब तहसिलदार गणेश भानवसे यांच्या उपस्थितीत तपोवन रस्त्यावरील हिंन्दुत्व चौक येथे छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी दोन इसम संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडे 3 किलो 660 ग्रॅम गांजा, गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे असा एकुण 83 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रवींद्र टटिया बारेला (वय 20, रा. वरळी पुरा, ग्राम कोट किराडी, ता. सेंदवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) व सचिन नानुराम ब्राम्हणे (वय 20, रा. कोटा किराडी, ता. सेंदवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक परशुराम दळवी, अंमलदार सुनील चव्हाण, नितीन उगलमुगले, योगेश चव्हाण, अब्दुल इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुमित गवळी, सतीष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सतिष भवर, महेश पाखरे, सुजय हिवाळे, भागवत बांगर, जिजा खुडे यांच्या पथकाने केली.





