अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील पशुधनावरील विविध आजारांच्या लसींच्या मात्रांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातून एकट्या नगर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. देशातील नगर (महाराष्ट्र) व अल्वर (राजस्थान) या दोन जिल्ह्यांची या कार्यक्रमात प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात 30 लाख पशुधन असून जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीत विविधता आहे यासाठी ही निवड करण्यात आली. या कार्यक्रमामुळे पशुपालकांना गुणवत्तापूर्ण व साथीच्या काळात वेळेत लस मात्रा उपलब्ध होणार आहे. तसेच लसीकरणाचे अचूक नियोजन करता येणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी आणि पशु पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत. पशुधनाला देण्यात येणार्या लस मात्राचे ऑनलाईन नियोजन आणि डिजिटेलायजेशन कार्यक्रम आणि दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यकमाचा शुभारंभ बुधवारी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत नगरमध्ये करण्यात आला. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सहसचिव सरिता चौहाण यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पाचे विश्लेषक डॉ. चिरंजीव भट्टचार्य व सल्लागार अतुल आनंद यांनी सादरीकरण आणि पशुसंवर्धनच्या अधिकारी पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिले. जागतिक महामारी समजल्या गेलेल्या करोना आजाराच्या लसमात्रा उपलब्ध करण्यासाठी व रूग्णांना देण्यासाठी डिजिटलायझेशनचा प्रभावी वापर करण्यात आला. त्याच पध्दतीने पशुधनाच्या आजारावरील लसमात्रा वेळेत व प्रभावीपणे उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटलायझेशन आणि शीतसाखळी व्यवस्थापन प्रणाली कार्यक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह वितरण करण्यासाठी ‘एविन’ (निमल वॅक्सिन इन्फॉर्मेशन नेटवर्क) या तंत्रज्ञानाचा वापर करून अॅप विकसित केले आहे. त्याव्दारे लसमात्रेचा प्रभावी उपयोग होण्यासाठी, ती योग्य तपमानाला, योग्य पध्दतीने साठवली जाणे आवश्यक असते.
अनेकदा पशुवैद्यकीय दवाखान्यातील शीतगृहात औषधांचा साठा पडून असतो, मात्र तो अन्य ठिकाणच्या पशुधनाच्या आजारावर योग्य वेळेत पोहोचत नाही, वापरला जात नाही. या कार्यपध्दतीत बदल घडून आणण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. याशिवाय या पध्दतीमध्ये ‘जीपीएस’ प्रणालीचाही वापर केला जाणार आहे. त्यामुळे पशुपालकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण लसमात्रा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात 30 लाखांवर पशुधन आहे. त्यामध्ये 13 लाख 78 हजार गाई, 2 लाख 63 हजार म्हशी, 11 लाख 49 हजार शेळ्या, 2 लाख 32 हजार मेंढ्या आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे. त्याच आधारावर नगर जिल्हा दुध उत्पादनात देशात अग्रेसर असून जिल्ह्याची भौगोलिक स्थिती भिन्न आहे.
याच आधारावर ‘एवीन’ प्रकल्पासाठी नगरची निवड करण्यात आली तर राजस्थानातील अल्वर जिल्ह्याचे तापमान पशुधनासाठी विपरीत मानले जाते. त्यामुळे या जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागातील अधिकार्यांनी सांगितले. या प्रणालीवर केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकार्यांची थेट नियंत्रण राहील. त्यामुळे पशुधनांचे लसीकरण प्रभावी होण्यासाठी मदत होणार आहे. जनावरातील लाळ्या खुरकत, रेबीज, शेळी मेंढ्यांमधील ‘पीपीआर’, संसर्गजन्य गर्भपात, घटसर्प, फर्या, कोंबड्यांमधील मानमोडी, देवी अशा आजारांवरील लसीकरणात प्रणाली प्रभावी ठरणार आहे. बुधवारी सुरू झालेल्या प्रशिक्षण कार्यकमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संभाजी लांगोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे उपस्थित होते.