धुळे – Dhule – प्रतिनिधी :
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील 40 हजार 964 शेतकर्यांना 307 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्या तुलनेत पीक कर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे अग्रणी बँक, जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकर्यांना पीक कर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
मंत्री श्री. भुसे आज धुळे जिल्हा दौर्यावर होते. या दौर्यात त्यांनी विटाई, बेहेड ता. साक्री येथील शेतकर्यांशी तसेच लोणखेडी, ता. जि. धुळे येथे शेती शाळेत सहभागी महिलांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, जिल्हाधिकारी संजय यादव, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या तुलनेत धुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना पीक कर्जाचा झालेला पुरवठा कमी आहे. या पार्श्वभूमीवर विशेष अभियान राबवून जास्तीत जास्त शेतकर्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. जेणेकरून शेतकरी उत्पादन वाढवू शकतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी पीक कर्ज वितरणाचा दर तीन दिवसांनी आढावा घ्यावा.
धुळे जिल्ह्यास रासायनिक खतांचा पुरेसा साठा येत्या आठ दिवसांत उपलब्ध करून देतानाच प्रत्येक शेतकर्याला रासायनिक खते मिळतील, असे नियोजन करावे. पीक पध्दतीनुसार शेतकर्यांना आवश्यक रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. यादव, महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चौधरी यांनी आपापल्या विभागांची माहिती दिली.