Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगमहती ज्येष्ठा-कनिष्ठांची...

महती ज्येष्ठा-कनिष्ठांची…

सुखकर्ता-विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले की लगोलग गौराईच्या आगमनाची लगबग सुरू होते. गौरी आवाहन, पूजन, जेवण करून या माहेरवाशिणींची पाठवणी केली जाते. गौराईचे तीन दिवस फार पर्वणीचे असतात. घराचा कानाकोपरा स्वच्छ होतो. त्यांच्या येण्याने घरात, बाहेर सर्वत्र एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा असते.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बाप्पा आणि गौरी येताहेत. गणेशोत्सवाचे दिवस आले की कायम उत्साह, वातावरणातून दरवेळी जाणवतो. बाप्पा विद्येचे दैवत! विघ्नहर्ता, सुखकर्ता असा त्याचा लौकिक आहे. तो एकटा येत नाही आपल्या सोबत ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींना बरोबर घेऊन येतो. काही ठिकाणी या गौरी त्याच्या भगिनी मानल्या जातात, तर काही ठिकाणी मातास्वरूप! तीघही येतात सोबत. आपल्या बाळांना घेऊन! फार गडबड, लगबग असते या गौरीपूजनाची.

भाद्रपद हा चार्तुमासाचा दुसरा महिना! श्रावण ओसरताना आपला सारा हिरवेपणा भाद्रपदाला देऊन जातो. सुंदर वातावरण असते. झाडे स्वच्छ तजेलदार झालेली असतात. विविध रंगांची फुले फुललेली असतात. म्हणूनच की काय बाप्पा आणि गौरींना विविध प्रकारची पत्री अर्पण करतात. सुगंधाची लयलूट करणारी फुले या दिवसात बघायला मिळतात. पूर्वी सोनचाफा सगळीकडेे आढळत नव्हता पण आता सहजपणे तो या दिवसातच नव्हे तर वर्षाचे काही दिवस वगळता नेहमी उपलब्ध असतो. या दिवसात तिवडीची फुलेही सापडतात. काही ठिकाणी याच तिवडीच्या झाडाला गौरी समजून त्याचे पूजन केले जाते. मला असे वाटते की, मुख्यत: निसर्गपूजन ही आपली संस्कृती आहे आणि त्याविषयी कृतज्ञता दाखवण्याचा हा एक प्रकार आहे.

- Advertisement -

गौरीपूजन यामागील एक कथा रोचक आहे. पृथ्वीवर असुरांचे वर्चस्व वाढले. त्यांनी विविध प्रकाराने सर्वांना प्रतिभगवान केले. अशावेळी सर्व स्त्रियांनी पार्वती मातेची आराधना करून तिला विनंती केली. आमच्या सौभाग्याचे रक्षण कर! ती जगतमाता होती. तिने त्यांच्या विनंतीला होकार देऊन असुरांचे निर्दालन केले. सर्व स्त्रिया मुक्त झाल्या आणि तिचे पूजन करू लागल्या. हेच दिवस भाद्रपदातले होते. तिचा आदर सत्कार करावा, तिचे पूजन करून आपली कृतज्ञता व्यक्त करावी या विचाराने, भावनेने हे गौरीपूजन, महालक्ष्मी पूजन केले जाऊ लागले. आदिशक्तीची पूजा आपल्याकडे नेहमीच केली जाते. कधी गौरी दुर्गा, कधी महालक्ष्मी, कधी महिषासूरमर्दिनी अशा विविध रूपात आपण मातेला पूजत असतो. आपल्या संस्कृतीचा हा मूळ गाभा आहे. निसर्ग विविध प्रकाराने पूजनीय आहे.

या पूजा विविध प्रकाराने पूजल्या जातात. राज्य, प्रांताचा यात भेद असतो. भावना मात्र एकच असते. पश्चिम महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी कनिष्ठा श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी बसते. तिची महिनाभर विधिवत पूजा केली जाते. ती आपल्या बाळाला पण सोबत आणत नाही. ज्या दिवशी ज्येष्ठा गौरी येते ती आपल्या सोबत तिच्या बाळाला पण घेऊन येते. गणपती बाप्पा या सर्वांना सोबत घेऊन येतो. तीन दिवस पाहुणचार घेऊन पाचव्या दिवसी बाप्पा या दोघी बहिणींना त्यांच्या बाळासकट त्यांच्या घरी पोहोचवतो. या ठिकाणी गणपती त्यांचा भाऊ मानण्याची पद्धत आहे. अशी पूजा माझ्या एका मैत्रिणीकडे केली जाते. ती गौरीचे सारे कौतुक मोठ्या आनंदाने, मायेने करते. त्या महिनाभरात तिच्याकडील वातावरणात एक वेगळीच पवित्रता असते.

कोकणात पद्धत वेगळी आहे. तिथे नदीवरून किंवा तलावाजवळून 5, 7 असे खडे आणतात. त्यांचीच महालक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. तिथे जे धान्य जास्त प्रमाणात होते त्याचाच पदार्थ गौरींना दाखवला जातो. धावन घाटलं असा प्रमुख प्रसाद असतो. तांदूळ आणि ओले नारळ विपुल प्रमाणात पिकत असल्यामुळे ते वापरले जाते. विदर्भात वर्‍हाडात ज्वारीच्या जाडसर कण्या, त्याला आम्बील रवा असे आजकाल नाव आहे. त्या कण्या ताकात शिजवतात. शिजत असताना खोबर्‍याचे तुकडे घालतात. मीठ मात्र टाकत नाहीत. अशी ही आम्बील, अम्बाडीची भाजी आणि भाकरी. शिवाय पावसाळा नुकताच संपल्यामुळे भाजीपाला विपुल प्रमाणात असतो. म्हणून 16 भाज्यांचाही नैवेद्यात समावेश असतो. ही पूर्वीची पद्धत झाली. मात्र, आजही या प्रमुख प्रसादासोबत विविध खाद्यपदार्थदेखील असतात. पुरणपोळी, वडा, कढी, पंचामृत असेही प्रकार असतात. शिवाय काही ठिकाणी फुलोरा म्हणजे करंजी, अनारसे, लाडू यांचाही समावेश असतो. आमच्या घरीही महालक्ष्मी आम्ही मांडतो. हे सर्व प्रकार करतो. सगळ्या मैत्रिणी जमतात. हौशीने सगळे केले जाते. महालक्ष्मीचे तीन दिवस फार पर्वणीचे असतात. घराचा कानाकोपरा स्वच्छ होतो. त्यांच्या येण्याने घरात, बाहेर सर्वत्र एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा असते. आपलेच घर आपल्याला नव्याने कळते! घरात नवीन पाहुण्याचे आगमन झालेले असेल तर ते या दिवसांना चार चांद लावते!

या गौरींना माहेरवाशिण म्हणतात. जणू खरोखर आपल्या लेकी मुलाबाळांना घेऊन माहेरी आल्या. त्यांचे कोडकौतुक किती आणि कसे करू? हा संभ्रम घरातल्या कर्त्या बाईच्या चेहर्‍यावर दिसत असतो! नव्या साड्या, काही एखादा दागिना, घरात एखादी नवीन वस्तू यानिमित्ताने घेतली जाते. जाता-येता काम करता, गौरींना निरखले जाते. अगंबाई! हे राहिलेच असा प्रश्न गृहिणीच्या मनात आला की त्याचे ताबडतोब निराकरण केले जाते. अशावेळी अशी मनाची धारणा होते की ही (गौरी) सगळे करवून घेतात. आपल्याला आठवण करून देतात. पूजेच्या विधीत कधी कधी जास्त राहिलेले सांगतात. एखाद्या पदार्थ करायचा विसरला तरी आठवण करून देतात. सर्व साग्रसंगीत पार पडले की रात्रीच्या वेळी निवांत त्यांच्या जवळ बसावे! विजेचे सर्व दिवे मालवून टाकावेत. तेलवातीच्या (समईतल्या) प्रकाशात त्यांचे चेहरे निरखावे! त्या आपल्याकडे बघत असातात. दोन दिवसांचा माहेरवाशिणीचा चेहरा असलेला त्या त्यावेळी आपली आई असतात. नकळत हात जोडून मायबाई अशीच काळजी घे! पोराबाळांचे रक्षण कर! मनातल्या इच्छा पूर्ण कर! नकळत मान झुकली जाते. साडीचा पदर पसरला जातो. ती हसत आशीर्वाद देते! हा शब्दाविण संवाद दरवर्षी मी अनुभवते. न बोलता मनातून तिला पुढच्या वर्षी नक्की ये! तुझे स्वागत करण्याची मला शक्ती दे! मला शक्ती दे!

- Advertisment -

ताज्या बातम्या