मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळवून देण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. कारण निवडणुकीआधी राज्य सरकारने (State Government) आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ काही काळातच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंर्तगत राज्यातील महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी केल्याने या योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. लाडकी बहीण योजना सुरु झाल्यानंतर महिलांना प्रत्येक महिन्याचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या महिन्याचे पैसे कधी मिळणार?याकडे राज्यातील महिला वर्गाचे लक्ष लागून होते. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या ह्प्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना आजपासून फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून (Finance Department) महिला व बालविकास विभागाला ३४९० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून दोन दिवसांपूर्वी तांत्रिक कारणामुळे हप्ता वितरीत करण्यात उशीर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना १५०० रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात २ कोटी ४६ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम पाठवली होती. त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना लाभ देण्यात आला. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे छाननी केल्यामुळे जानेवारी महिन्यात ५ लाख महिलांची संख्या घटली होती. त्यानंतर महिला व बाल विकास विभागाने केलेल्या पडताळणी प्रक्रियेत लाभार्थी महिलांची (Women) संख्या आणखी ४ लाखांनी घटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साधारणपणे २ कोटी ३७ लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये मिळणार आहेत.