Sunday, November 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSada Sarvankar : शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांचे माघारीबाबत महत्वाचे वक्तव्य;...

Sada Sarvankar : शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांचे माघारीबाबत महत्वाचे वक्तव्य; म्हणाले, आपली एक मागणी मनसेने मान्य केली तरच…

मुंबई | Mumbai

माहिम मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी माघारीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला थोड्या वेळापूर्वी फोन आला असल्याचे सांगितले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर काही वेळापूर्वी बोलणे झाले असून पक्ष हिताच्या दृष्टीने आपली एक मागणी मनसेने मान्य केली असल्याने पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय जाहीर करु असे सूचक विधान सरवणकरांनी केले आहे.

- Advertisement -

मुंबईच्या माहिममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले आहेत. तर, सदा सरवणकर देखील शिंदे गटाकडून उमेदवार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर यांनी माहिममधून माघार घ्यावी यासाठी भाजपकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार मागणी करण्यात ये आहे. इतकेच नाहीतर भाजप अमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच या माध्यमातून लोकसभेला राज ठाकरेंनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या मोबदल्याचा फॉर्म्युला ठरल्याचे सूचित करण्यात आले आहे.

सदा सरवणकर काय म्हणाले?

सदा सरवणकर यांनी सांगितले की, पत्रकार परिषद घेण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन कॉल आला होता. एकनाथ शिंदे आमचे नेते आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे हीच इच्छा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा कार्यकर्त्यांसोबत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण उमेदवारी मागे घेण्यास तयार आहोत. पण, आपली एक अट असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आपल्या मनसेचे मुंबईतील सगळेच उमेदवार मागे घ्यावेत, अशी अट सरवणकरांनी घातली आहे.

धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार विधानसभेत जावे अशी इच्छा आहे. मनसे उमेदवार मागे घेण्यास तयार आहे,” असे सरवणकरांनी सांगितले. “मी मतदारांची मागणी मान्य करुन, शिंदे साहेबांची इच्छा मान्य करुन कार्यकर्त्यांशी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो निर्णय वेळीच जाहीर करेन,” असे सरवणखरांनी सांगितले आहे. सध्या माहिममध्ये माझ्यासाठी ५० ग्रुप प्रचार करत फिरत आहेत. आम्ही आता चर्चा करु आणि काय ते ठरवू असे सांगत सरवणकरांनी माघार घेण्यासंदर्भातील सूचक विधान केले आहे.

“एका सीटमुळे सर्व वातावरण खराब व्हावे असे वाटत नव्हते. राजसाहेबांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. महायुतीचे आमदार वाढावे अशी इच्छा आहे. कार्यकर्त्यांना डावलून निर्णय घेता येणार नाही. तू तुझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संघटनेच्या हितासाठी अशाप्रकारचा त्याग केलेला आहे. एका आमदारकीसाठी अडकून राहणे हे संयुक्तिक होणार नाही. मी अर्ज मागे घेणार नाही. त्यांना आपल्या पक्षाचे हीत, राज्याचे मुख्यमंत्री या साऱ्याचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या भावाना मी तुमच्यापर्यंत कळवल्या. त्याचे उत्तर कार्यकर्त्यांशी बोलूनच देता येईल,” असे म्हणत सरवणकरांनी केवळ माघार घेण्यासंदर्भातील शिक्कामोर्तब बाकी असल्याचे सूचक विधान केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या