छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना त्यांच्याच पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. शहरातील बायजीपुरा भागात ही घटना घडली असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील हे बायजीपुरा परिसरात पदयात्रा काढत होते. ही पदयात्रा सुरू असतानाच पक्षातील काही नाराज कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
मात्र, काही वेळातच या विरोधाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांची कार अडवली आणि त्यावर हाता-बुक्क्यांनी तसेच लाथांनी प्रहार करण्यास सुरुवात केली. या गोंधळात जलील यांनाही मारहाण करण्यात आली. एमआयएमचे अधिकृत कार्यकर्ते आणि नाराज गट यांच्यात यावेळी तुंबळ हाणामारी झाली.
दोन गटांतील वाद विकोपाला गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा राडा थांबला असला तरी परिसरात अजूनही तणाव कायम आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी वाटप किंवा अन्य स्थानिक मुद्द्यांवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या अंतर्गत वादाचा फटका थेट प्रदेशाध्यक्षांना बसल्याने एमआयएमच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. या हल्ल्यानंतर जलील यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रचाराच्या धामधुमीत घडलेल्या या हिंसक घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.




