Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यालाचेची मागणी झाल्यास बिनधास्त तक्रार करा

लाचेची मागणी झाल्यास बिनधास्त तक्रार करा

नाशिक । फारुक पठाण Nashik

शासनाच्या कोणत्याही विभागात नागरिकांच्या लहान किंवा मोठ्या कामांसाठी लाचेची मागणी होत असेल तर त्यांनी त्वरित व बिनधास्तपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी. त्यांचे नाव संपूर्णपणे गुप्त ठेवले जाते. विशेष म्हणजे त्या तक्रारदाराच्या कामाची गॅरंटी आमची होऊन जाते. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. तेव्हा नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करावा, असे आवाहन नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले.

- Advertisement -

‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार 30 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ केला. 2001 पासून महाराष्ट्र राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. 5 नोव्हेंबरपर्यंत जनजागृती सप्ताह चालणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशदूत’ने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर यांच्याशी संवाद साधला.

शासनाच्या विविध विभागांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र लाचलुचपत विभागाकडे नागरिक तक्रार करायला काही प्रमाणात घाबरतात. म्हणून याबाबत सामान्य नागरिकांमध्ये आणखी जनजागृती होण्याची गरज आहे. ज्या व्यक्तीचे काम भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे होत नसेल त्यांनी बिनधास्त आमच्याकडे तक्रार करावी. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यांच्या कामाची गॅरंटी घेतो. तसेच तक्रारदाराचे नावही गुपित ठेवतो. यामुळे नागरिकांनी पुढे येऊन भ्रष्ट अधिकारी, सेवकांची तक्रार करावी, असे वालावलकर यांनी सांगितले.

भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यासाठी शासनाच्या गृहविभागाअंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साईड बॅच म्हणून समजला जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्या विरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे तर उस्मानाबाद, सोलापूर, तुळजापूर, अहमदनगर इत्यादी ठिकाणी त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदार्‍या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.

कोणावर होते कारवाई?

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा राज्य शासन ज्यांना पगार देतो त्यांच्यावर कारवाईसाठी सक्षम आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तातडीचे प्रकरण झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून लाचखोरला जेरबंद करण्याची परवानगी असते. नंतर मात्र ते प्रकरण संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येते.

नाशिक अव्वलच

लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागात मागील 10 महिन्यांत तब्बल 139 गुन्हे दाखल करून 234 लाचखोर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एसीबीच्या आठ विभागांत नाशिक कारवाईत पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून अधिक गतीने काम होत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या