चांदा (वार्ताहर)
नेवासा तालुक्यातील भाजपाला सुरू झालेली गळती अजूनही सुरूच आहे. काल तेलकुडगाव येथील भाजपा पदाधिकार्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आमदार गडाख गटात प्रवेश केला आहे.
गत आठवड्यात चांदा जिल्हा परिषद गटातील शिंगवेतुकाई येथील कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आमदार गडाख गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता तेलकुडगाव येथील कार्यकर्त्यांनीही भाजपाला रामराम ठोकून आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याने नेवासा तालुक्यातील भाजपाची गळती सुरूच असल्याचे दिसत आहे.
तेलकुडगाव येथे पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनीताताई गडाख यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमात भाजपातील दीपक बाळासाहेब घाडगे, संजय भागचंद घाडगे, चंद्रकांत वसंत घाडगे, प्रदीप बबन काळे, अभिजीत कारभारी काळे, रेवन्नाथ भानुदास गटकळ, काकासाहेब रावसाहेब काळे, शंकर हरिभाऊ गायकवाड, ज्ञानदेव निवृत्ती गटकळ, गोकुळ नारायण काळे, बाळासाहेब हरिभाऊ काळे, बाबासाहेब कारभारी काळे, ज्ञानदेव मोहन काळे आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आमदार गडाखांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत जाहीर प्रवेश केला आहे.
आमदार गडाखांनी नेवासा तालुक्यात सर्वांना सोबत घेत सुरू केलेल्या विकासकामाने आपण प्रभावित झालो असून नेवासा तालुक्याला सक्षम आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व मिळाल्याने येथून पुढे आम्ही सर्व कार्यकर्ते आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली एकदिलाने काम करणार आहोत, असे आ. गडाख गटात प्रवेश करणारे संजय घाडगे यांनी सांगितले.
सौ.गडाख म्हणाल्या की, गावच्या विकासासाठी तळमळ असणार्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने संघटनेची ताकद वाढली असून यापुढेही गावातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. माजी खासदार यशवंतराव गडाख व स्व. मारूतराव घुले पाटील यांनी दिलेली शिकवण आपण याही पुढे चालू ठेवू. असे आवाहनही सौ. गडाख यांनी केले.