Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधकाँग्रेसमध्ये ‘प्रशांत’ वादळ

काँग्रेसमध्ये ‘प्रशांत’ वादळ

आठ वर्षांपूर्वी देशाच्या राजकारणात निवडणूक रणनीतिकार म्हणून ख्यातकीर्द झालेले प्रशांत किशोर सध्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी आसुसले आहेत. प्रशांत किशोर यांनी देशातील बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांना राजकीय डावपेच शिकवले आहेत. त्यांची राजकीय निष्ठा ही एखाद्या पक्षासाठी फार काळ राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसमध्ये विरोधाचे सूर आहेत.

प्रशांत किशोर यांना थेट पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी, आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी, असा काहींचा मतप्रवाह आहे. त्यामुळे जी-23 वरून निर्माण झालेले वादळ शमलेले नसतानाच आता प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाने नवे वादळ काँग्रेसमध्ये निर्माण होताना दिसत आहे.

बहुचर्चित निवडणूक रणनीतिकार ‘पीके’ ऊर्फ प्रशांत किशोर जर काँग्रेसमध्ये दाखल झाले तर काँग्रेससाठी हा डावपेच उपयुक्त राहील की ओझे ठरेल, हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जाणारा लाखमोलाचा प्रश्न आहे. 2014 पासून चर्चेत आलेल्या प्रशांत किशोर यांनी देशातील बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांना राजकीय डावपेच शिकवले आहेत. त्यांची राजकीय निष्ठा ही एखाद्या पक्षासाठी फार काळ राहिलेली नाही. अशावेळी त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही यावरून काँग्रेसमध्ये जोरात चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

प्रशांत किशोर यांनी एकाच आठवड्यात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसमवेत दोन बैठका घेतल्या. गेल्या आठवड्यात तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत प्रशांत किशोर सहभागी झाले होते. त्यात त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक रोडमॅप तयार केला. यामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या उणिवांची माहिती दिली. पाच विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस कोठे कमी पडली, काही राज्यांतून काँग्रेसचे अस्तित्वच कशामुळे संपले असावे, याबाबतचे तर्क मांडले. त्याचवेळी भविष्यकाळातील कृती आराखडाही सांगितला. ही बैठक पाच राज्यांत काँग्रेस पक्षाला पत्कराव्या लागलेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे आयोजित केली होती. विशेषत: पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील पराभव काँग्रेसच्या चिंतेत भर घालणारा होता. काँग्रेसचे नेतृत्व दोन लोकसभा निवडणुका आणि काही विधानसभा निवडणुकीत सातत्याने पराभावाचा सामना करत आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत काँग्रेसला आपली प्रतिमा सुधारायची आहे. या वर्षाखेरीस आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि 2024 मध्ये लोकसभेची रणधुमाळी आहे. अशावेळी काँग्रेसला आपले अस्तित्व पुन्हा दाखवायचे आहे.

सध्याच्या स्थितीत काँग्रेस केवळ दलबदलू राजकारणाचा सामना करत नाहीये, तर जुने नेते आणि नवीन नेते यांच्यातील वैचारिक संघर्षालाही पक्ष सामोरा जात आहे. नेतृत्वावरून अस्वस्थ असलेल्या 23 नेत्यांत काही माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संघटनेची पुनर्बांधणी आणि संघटनात्मक निवडणुकीची मागणी केली होती.

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाबाबत गेल्या वर्षीपासून चर्चा सुरू झाली. पण त्या चर्चेने जोर धरण्यापूर्वीच काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याशी संपर्क साधला. यावरून गांधी कुटुंबीय पक्षाबाहेरील व्यक्तीची मदतीसाठी वाट पाहत होते, हे स्पष्ट झाले. मागील आठवड्याच्या बैठकीनंतर ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे स्पष्ट करण्यात आले. पण दुसर्‍या बैठकीनंतरही काँग्रेस प्रवेशाबाबत ठोस निष्कर्ष बाहेर आले नाहीत. एखाद्या आठवड्यात घोषणा होऊ शकते, अशी प्रशांत किशोर यांना आशा आहे. त्यांना मोठे पद मिळत असेल तर ते उत्सुक राहतील.

10 जनपथ येथील बैठकीत काँग्रेससमोर रणनीतीचा खुलासा करताना प्रशांत किशोर यांनी म्हटले की, काँग्रेसने लोकसभेच्या 542 जागांपैकी 370 ते 400 जागांवरच अधिक लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर काही विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवायला हव्यात. ज्या ठिकाणी स्थिती चांगली आहे किंवा दुसर्‍या स्थानावर आहे, अशा ठिकाणी स्वबळाचा डाव खेळायला हवा. तसेच ज्या ठिकाणी काँग्रेसचे महत्त्व कमी झाले आहे अशा राज्यांतून म्हणजेच उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशासारख्या राज्यात नव्याने सुरुवात करायला हवी, असे ‘पीकें’चे म्हणणे आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर यांनी म्हटले की, आपण बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केला तर तेथे एकूण लोकसभेच्या 200 जागा आहेत. या ठिकाणी लोकप्रियता असूनही भाजपकडे 50 जागा आहेत. उर्वरित 350 ठिकाणी भाजप विरोधकांच्या आशेवर पाणी फेरू शकतो.

काँग्रेसच्या वर्तुळात या नवीन राजकीय वाटचालींवरून उत्सुकता आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये मात्र प्रशांत किशोर यांच्या प्रवेशावरून मतभेद आहेत. गांधी घराणे पक्षासाठी आऊटसोर्सिंगचा विचार करत आहे, ही बाब त्यांना पटतच नाहीये. सुरुवातीपासूनच काँग्रेसचा मोठा गट प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाच्या विचाराला विरोध करत आहे. वास्तविक पक्ष अगोदरच जी-23 गटाच्या बंडखोरीचा सामना करत आहे. अशातच त्यांच्या प्रवेशानंतर पक्षातील असंतोष आणखी वाढू शकतो. एकीकडे प्रशांत किशोर यांच्या प्रवेशावरून काँग्रेसचे बंडखोर हे पक्षाला होणारा संभाव्य फायदा आणि नुकसान या दृष्टिकोनातून पाहत आहेत तसेच ते पक्षाच्या विचारसरणीशी कितपत बांधील राहतील याबाबत भीती व्यक्त करत आहेत. त्यांना पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी, असा काहींचा मतप्रवाह आहे. आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी. या गोष्टी हायकमांडकडेच असणे गरजेचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे.

प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेत्यांतील चर्चा ही नवीन गोष्ट नाही. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे क्लाएंट असलेल्या तृणमूल काँग्रेसने दमदार विजय मिळवला. त्यानंतर गांधी कुटुंबाबरोबर अनेकदा चर्चा झाली आहे. परंतु ती गोेष्ट निष्कर्षाप्रत पोहोचली नाही.

पाच राज्यांतील दारूण पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीती आणि दीर्घकालीन योजनेसह ‘कमबॅक’ केले आहे. 2014 मध्ये राजकीय उलथापालथीच्या वातावरणात मैदानात उतरलेले नरेेंद्र मेादी यांना प्रचार मोहिमेत त्यांनी मदत केली होती. तेव्हा त्यांनी दीर्घकालीन योजनेचा विचार केला होता. यादरम्यान त्यांनी जवळपास अर्धा डझन प्रादेशिक पक्षांबरोबर काम केले. दुसरीकडे त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मदतही केली. यात ममता बॅनर्जी यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. जेडीयूबरोबर त्यांची अडखळत सुरुवात झाली. त्यात ते उपाध्यक्षदेखील राहिले होते. पण त्यांची राजकीय निष्ठा एखाद्या पक्षाबरोबर फार काळ राहिली नाही. परिणामी तत्कालिन जेडीयूप्रमुख नितीशकुमार यांच्यापासून फारकत घेत त्यांनी वेगळा मार्ग निवडला. प्रशांत किशोर हे आपल्या ग्राहकाकडून म्हणजेच पक्षाकडून मोठी फी आकारतात. नेत्याचे इमेज बिल्डिंग, राजकीय मोहिमा, आघाडी आदींबाबतही सल्ला देतात. टीकाकारांच्या मते, प्रशांत किशोर हे नेहमीच जिंकणारे पक्ष सोबत घेतात. परंतु उत्तर प्रदेशात काँग्रेसबाबतीत ते अपयशी ठरले. विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक कधीही लढली नाही. एका मुलाखतीत म्हटले होते की, आपण कधीही टीव्हीवरचे न्यूज चॅनेल्स पाहत नाही, वर्तमानपत्रही वाचत नाही. ते कधीही मेल्स लिहीत नाहीत आणि नोटस्देखील काढत नाही. गेल्या दहा वर्षांत लॅपटॉपचा वापर केलेला नाही. ते केवळ एकमेव उपकरण वापरतात, मोबाईल फोन.

प्रशांत किशोर यांना प्रवेश दिल्यानंतर पक्षातील मातब्बर नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल. त्यांच्या प्रवेशावरून केवळ काँग्रेसच नाही तर तृणमूल काँग्रेस किंवा अन्य पक्षांतही असंतोषाचे स्वर पाहावयास मिळतील. दिनेशभाई द्विवेदींसारख्या तृणमूल काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना प्रशांत किशोर यांच्या हस्तक्षेपाचा आरोप केला होता. म्हणूनच नेतेमंडळी प्रशांत किशोर हे आगामी काळात एक काँग्रेस नेते म्हणून कसे वावरतात, याकडे लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या