Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधसाथी गुलाबराव पाटील

साथी गुलाबराव पाटील

-बापू ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार धुळे

साथी गुलाबराव पाटील यांच्या दुःखद निधनाने, सुमारे पंचेचाळीस, पन्नास वर्षापूर्वीचा काळ दृष्टीसमोर उभा ठाकला. तेव्हा ते तरुण-तडफदार नेते, म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात तळपू लागले होते. समाजवादी पक्ष तेव्हा दोन पक्षात विभागणी झालेला होता. संयुक्त समाजवादी पक्ष आणि प्रजा समाजवादी पक्ष, हे दोन पक्ष स्वतंत्रपणे, ध्वज-चिन्ह घेऊन कार्यरत होते. जळगाव जिल्हा तसेच मराठवाडा विभाग, तेव्हा समाजवादी विचारांचा पाठीराखा मानला जाई. पैकी मारठवाड्यात सर्व कार्यकर्त्यांनी मिळून, बहुताने निर्णय करुन संयुक्त समाजवादी पक्षात जाण्याचे ठरविले होते. जळगाव जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी जोमदारपणे वेगवेगळे अस्तित्व ठेवून, पक्षांची वाटचाल सुरु ठेवली होती.

- Advertisement -

अ‍ॅड.वाय.एम. बोरोले, के.एम. पाटील, जी.बी. महाजन, आचार्य गजाननराव गरुड, ग.वि. जोशी गुरुजी, भिकचंद शर्मा आदी प्रजा समाजवादी पक्षात होते. साथी गुलाबराव पाटील, हे नव्या दमाचे व उमेदीचे नेते म्हणून त्या फडात उभे राहिले होते. दुसरीकडे संयुक्त समाजवादी पक्षात लोटूभाऊ फेगडे, ब्रिजलाल पाटील, अ‍ॅड.मधुसूदन दंडवते, बी.डी. पवार, ओंकार नारायण वाघ, अ‍ॅड.डी.के. चौधरी, अ‍ॅड.जे.डी. जाधव, राजारामभाऊ पाटील, दगडू सैंदाणे, राजाबापू देशमुख, शाहीर वना पाटील, अशी नेते मंडळी होती.

प्र.स. पक्षाचे मुखपत्र म्हणून साप्ताहीक जनसाथी हे नियतकालीक निघत होते. जमनादास काबरा यांनी नोंदविलेले हे पत्र पक्षाने गुलाबराव पाटील यांना संपादक नेमून, त्यांना सोपविले. अशा प्रकारे साथी गुलाबराव पाटील यांचा पत्रकारितेत प्रवेश झाला. गुलाबराव पाटील अमळनेर तालुक्याचे रहिवाशी होते. तेथे पक्षाचे चांगले केडर होते. पण नेतृृत्वाचा अभाव होता. वामन माणकू पाटील, त्र्यंबक पांडू पाटील, भिका सुपडू पाटील, सिताराम अण्णा, परभत दादा पन्नालाल जैन आदी कार्यकर्ते आपापल्या परीने कार्य करीत होते. त्यांना गुलाबराव वामनराव पाटील हे नेते मिळाल्याने पक्षाला उठाव मिळाला. तालुक्यातील प्रतिष्ठीत नेत्यांना त्यांना एकटे पाडून नामोहरम करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. गुलाबरावांनी राजकीय डावपेचाचा भाग म्हणून काँग्रेस बरोबरच सर्व स्थानिक नेत्यांना झोडून काढण्याचा सपाटा चालविला. ज्यांचे विरोधात कोणीही बोलू शकत नव्हते, त्यांचे जाहीररित्या वस्त्रहरण सुरु झाले. त्यामुळे लोकांना हिंमत आली. लोक गुलाबराव बापूंना पाठिंबा देऊ लागले. त्यांच्या सभांना गर्दी होऊ लागली. अमळनेर मध्ये फलकावर मजकूर झळकू लागला. तेथेही गर्दी होत असे. हळूहळू लोकांना नवे नेतृत्व प्रस्तापित झाले. खुशाल दादा, के.एम. पाटील, उमराव अबू, जगतराव पवार, अमृत अप्पा यांना नवा पर्याय तयार झाला. शेतकी संघ, मार्केट कमिटीत सत्तातंर झाले.

दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेच्या दहिवद गटात पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक जिल्ह्यातील सर्व समाजवादी कार्यकर्त्यांनी मिळून लढविली. गुलाबराव पाटील यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत तरुण वयात मी दविहद मुक्कामी दहा-बारा दिवस होतो. तेव्हा बापूंच्या घरीच राहिल्याने त्यांचे सर्व कुटुंबिय, भाऊबंद, मित्र परिवार यांचेशी जवळून परिचय झाला. ही निवडणूक विक्रमी मतांनी जिंकून गुलाबराव पाटील जिल्हा परिषदेच्या सभागृहात दाखल झाले. या विजयाने अमळनेर तालुका ही मर्यादा ओलांडून ते जिल्ह्याचे उगवते व उमदे नेते बनले. पुढे प्रजा समाजवादी व संयुक्त समाजवादी पक्षाचे विलनीकरण झाले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे, म्हणून नेरी ता.जामनेर, येथे बैठक झाली. अमृत चिंधू पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले. ते नंतर जिल्हा दूध संघाचे चेअरमन होते. जनसाथी नियतकालिकाचा मागे उल्लेख आला आहे. ते बंद होते. नेरीच्या बैठकीत, त्या वृत्तपत्राच्या संपादकाची जबाबदारी, गुलाबरावबापूंकडून, माझ्याकडे सोपविण्यात आली. मी जनसाथीचा संपादक झालो खरा, पण ते पुढे चालविणे, मला जमले नाही. हे अपयश माझे खात्यावर जमा आहे. पण त्यांचा मित्र व सहकारी ही भूमिका मी दिर्घकाळ चालविली.

त्यांची एक आठवण कायम स्वरुपी माझे मनावर कोरलेली आहे. 1978 साल, मे महिना होता. मी जळगावला राहत असलो तरी चोपडा, हे माझे मुळ गाव आहे. तेथे चोपडा शेतकरी संघाच्या भ्रष्टाचाराबाबत, गुलाबराव बापूंची सभा होती. आठवडे बाजार चौकातील या सभेला प्रचंड गर्दी होती. त्या सभेला मी हजर होतो आणि मला व्यासपीठावर बसविले होते. त्याच दिवशी माझे लग्न झालेले होते. बापूंनी सभा सुरु होताच, माझा उल्लेख करुन आजच लग्न झालेला नवरदेव मी तुमच्यासमोर उभा करतो, असे जाहीर केले. मी काही तरी वेडेवाकडे भाषण केले. पण प्रसंग कधीच विसरता आला नाही.

सुरुवातीला ते प्रसपाचे नेते व मी संसपाचा कार्यकर्ता अशी फाळणी असल्याने काही मतभेद होते. नंतर ते मंडल आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर सभा घेत होते. तेव्हाही आमचे वैचारीक अंतर वाढले. पण त्यांनी प्रेम कधीच कमी केले नाही. ते तीन वेळा आमदार झाले, हे त्यांचेवरील लोकांच्या प्रेमाचे द्योतक आहे. सानेगुरुजींच्या कार्यभूमीत, त्यांच्या विचारांचा वारसा चालवित राहिले. त्यांच्या कार्याबद्दल माहिती देणारी बरीच मंडळी आहे. ते अलीकडे घराबाहेर फारसे जात नव्हते. त्यामुळे खूप दिवसात त्यांची भेट झाली नाही. थट्टामस्करी व इतर गप्पागोष्टी झाल्या नाहीत. आता तर ती वाटच बंद

- Advertisment -

ताज्या बातम्या