Saturday, May 4, 2024
Homeनाशिकविंचूरला 2 हजार वाहनांमधून कांदा विक्रीला

विंचूरला 2 हजार वाहनांमधून कांदा विक्रीला

विंचूर। Vinchur (वार्ताहर)

तब्बल आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विंचूर उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात लाल व उन्हाळ कांद्याची आवक झाल्याने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर सुमारे 5 कि. मी. पर्यंतच्या लांबच-लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

सोमवारी उन्हाळ कांदा 500 रु. पासून ते 1145 तर सरासरी 900 रु. प्रति क्विंटल दराने विक्री झाला. कांद्याचे भाव झपाट्याने खाली येत असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

विंचूर उपबाजार आवारावर शेतमाल भुसार लिलावाबरोबरच गेल्या दोन वर्षापासून कांदा लिलाव सुरू केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात येथे कांदा विक्रीसाठी आणीत आहेत. येथील उपबाजार आवार बघता शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या वाहनांसाठी ही जागा अपुरी पडू लागली आहे. शनिवार (दि. 27) मार्चपासून मार्च अखेरचे कारण देत शेतमाल लिलाव बंद होते.

काल सोमवार (दि. 5) एप्रिल रोजी कांदा लिलाव सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी मोठी गर्दी केली होती. जवळपास 2 हजार पेक्षा अधिक वाहनांमधून कांदा विक्रीसाठी आला होता. तर उपबाजार आवारासमोरील महामार्गावर ट्रॅक्टर, पिकअप आदी कांदा विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या सुमारे 5 कि. मी. अंतरापर्यंत रांगा लागल्याचे दृश्य प्रथमच पहावयास मिळाले.

सोमवारी विंचूरला लाल कांदा 821 रु. पासून ते 900 रु. दराने विक्री झाला. यावेळी सरासरी बाजारभाव 750 रु. प्रति क्विंटल प्रमाणे राहिले. तर उन्हाळ कांदा 500 रु. पासून ते 1145 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला.

यावेळी उन्हाळ कांद्याला सरासरी 900 रु. भाव मिळाला. कांद्याप्रमाणे गहू सरासरी 1800 रु. प्रति क्विंटल, सोयाबीन 6500 रु., मका 1420 रु., हरभरा 5500 रु., बाजरी 1203 रु., मुग 2500 रु., तुर 5961 रु., उडीद 5900 रु. प्रति क्विंटल दराने विक्री झाली. उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम बहरात आला असतांनाच या कांद्याचे भाव झपाट्याने खाली येत असून यावर्षी परतीच्या पावसाने दिर्घकाळ लावलेली हजेरी, त्यानंतर झालेली गारपीट, अल्प थंडीमुळे कांद्याची पोषक क्षमता घटली.

अशा सर्व बिकट परिस्थितीत कांद्याचे उत्पादनात मोठी घट होत असून यानंतर काढणीला येणारा कांदा पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही.

मात्र असे असतांनाही कांद्याला भाव नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडू लागले आहे. कारण या कांदा पिकावरच झालेला खर्च वसूल करण्याबरोबरच नविन खरिप हंगामातील पीके उभी करण्याची लगबग करावी लागते. मात्र आता कांदा पिकाला भाव नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या