Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकआदिवासी आयुक्त व प्रकल्प कार्यालयात उद्या 'आदिहाट'चे उद्घाटन

आदिवासी आयुक्त व प्रकल्प कार्यालयात उद्या ‘आदिहाट’चे उद्घाटन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यासाठी आदिहाट सुरू करण्यात येणार आहे…

- Advertisement -

आदिवासी विकास आयुक्त, सर्व अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयात आदिहाटचे उद्घाटन गुरुवारी (दि.26) प्रजासत्ताक दिनी  करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे (Naina Gunde) यांनी दिली आहे.

आदिहाटच्या माध्यमातून आदिवासी कुटूंबांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी संस्कृतीशी निगडीत साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.आदिवासी विकास विभाग अतर्गत असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयासोबतच आदिवासींच्या स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे रेल्वे आणि बसस्थानक येथेही हे आदिहाट उभारण्यात येणार आहे.

आदिवासी बांधवांच्या हातातल्या कलाकुसरीला आदिहाट मधून शहरांच्या ठिकाणी असणारा जाणकार ग्राहक वर्ग मिळणार असून त्यामुळे रोजगार निर्मीतीसाठी मदत होणार आहे, असेही आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्यात अनेक आदिवासी जमाती आहेत. प्रत्येक जमातीच्या वेशभूषा, परंपरा थोड्या फार फरकाने वेगवेगळ्या आहेत.प्रत्येक ठिकाणी वैविध्य जरी असले तरी त्या बाबी आज टिकवून आणि जतन करण्याचे श्रेय आपल्या आदिवासी बांधवाना जाते.आदिवासी संस्कृती खूप संपन्न आणि समृद्ध आहे.

पाककृती,हस्तकला, बांबूकला, चित्रकला, औषधे यांनी आदिवासी समाज समृद्ध आहे. त्यांच्या याच कलेचा रोजगार निर्मितीसाठी उत्तमप्रकारे वापर करता येऊ शकतो. या सर्व बाबी आपल्याला ह्या ठिकाणी एका छताखाली बघायला मिळणार आहे. यापूर्वी विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनामध्ये अनेक आदिवासी बचत गटांनी सहभाग घेतला आहे.मात्र,ते मर्यादित कालावधीपुरते असते. याचाच विचार करून, आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी वस्तू विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी.या हेतूने आदिवासी विकास विभाग ‘आदिहाट’ ची सुरुवात येत्या प्रजासत्ताक दिनापासून करण्यात येणार आहे.

‘आदिहाट’ हा आदिवासी विकास आयुक्तालय तसेच सर्व अपर आयुक्त कार्यालये आणि प्रकल्प कार्यालये या ठिकाणी असणार आहे.गुरुवारी दि.२६ जानेवारी रोजी वरील सर्वच ठिकाणी याचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये आदिवासी कुटूंबांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी संस्कृतीशी निगडीत साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ इ. वस्तू विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी विकास विभागांतर्गत असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयासोबतच आदिवासींच्या स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे रेल्वे स्थानक आणि बस स्थानक येथेही हे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामुळे निश्चितच रोजगारनिर्मितीसाठी विभागाची मदत होणार आहे.

‘आदिहाट”च्या माध्यमातून हक्काची विक्रीव्यवस्था आपण आदिवासी बांधवांना उपलब्ध करून देत आहोत. कला कायम जतन आणि संवर्धन केली पाहिजे. आदिवासी बांधवांच्या हातातल्या कलाकुसरीला आदिहाटच्या माध्यमातून शहरांच्या ठिकाणी असणारा जाणकार ग्राहक वर्ग मिळणार आहे. ज्यामुळे निश्चितच रोजगार निर्मितीसाठी मदत होईल.

– नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या