Tuesday, October 22, 2024
Homeनाशिककृषि क्षेत्राच्या विकासात महत्वपुर्ण भुमिका बजावणार छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल-...

कृषि क्षेत्राच्या विकासात महत्वपुर्ण भुमिका बजावणार छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल- मंत्री दादा भुसे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी विज्ञान संकुलाचे आज लोकार्पण

मालेगाव | प्रतिनिधी
मालेगावसह नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे व कृषि क्षेत्राच्या विकासात महत्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांनी काष्टी शिवारात ६५० एकर क्षेत्रावर साकारण्यात आलेल्या कृषि विज्ञान संकुलातील पाच कृषि महाविद्यालय व कृषि तंत्र निकेतन महाविद्यालय लोकार्पण सोहळ्याची माहिती दिली.

- Advertisement -

शुक्रवारी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कृषि विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखेपाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, उदय सामंत आदी मंत्र्यांसह विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच ठिकाणी पाच कृषि महाविद्यालय व कृषि तंत्र निकेतन पदविका महाविद्यालय साकारत आहे. या महाविद्यालयांमध्ये बाराशे ते पंधराशे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. यामध्ये कृषि महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे पदवी महाविद्यालय तसेच कृषि तंत्रनिकेतन पदविका विद्या शाखांच्या अध्यापनासाठी दरवर्षी साधारणतः तीनशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक विषयाच्या महाविद्यालयासाठी आधुनिक तंत्रज्ञान युक्त प्रयोगशाळा व सुसज्ज स्वतंत्र इमारत राहणार असून विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी सर्व सुविधायुक्त सुसज्ज वस्तीगृह तसेच ग्रंथालयाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री भुसे यांनी पुढे बोलतांना दिली.

या कृषि विज्ञान संकुलात विद्यार्थ्यांबरोबर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन मिळणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी स्पर्धा परिक्षा तसेच बँकिंग व विविध स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहणार असून शेतीपुरक उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन देखील होणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी उच्च प्रतिच्या पिकांचे व भाजीपाला पिकांची रोपे जैवीक खते, किटकनाशके उपलब्ध करून दिली जाणार असून शेतकरी बांधवांना फळे, भाजीपाला प्रक्रिया, दुध व दुधजन्य पदार्थ व्यवसाय, गांडुळ खत प्रकल्प याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याची माहिती भुसे यांनी पुढे बोलतांना दिली.

कृषि विज्ञान क्षेत्रातील मुलभूत शिक्षण व संशोधन तसेच शेतकऱ्यांच्या गरजा व समस्या यांच्या अनुषंगाने संशोधन व विस्तार कार्य हेच विज्ञान संकुलातील कृषि महाविद्यालयांचे उद्दीष्ट आगामी काळात राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षापुर्वी या संकुलाचे भुमीपूजन केले होते. दोन वर्षात पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण करण्यात यश आले असल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या संकुलाचे लोकार्पण होत आहे.

दुसऱ्या टप्प्याचे काम देखील लवकरच पुर्ण होणार आहे. हे कृषि विज्ञान संकुल कृषि क्षेत्रात विकासासाठी मोठी भुमिका बजावेल, असा विश्वास पालकमंत्री भुसे यांनी शेवटी बोलतांना व्यक्त करत या लोकार्पण सोहळ्यास शेतकरी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. संजय दुसाने, मनोहर बच्छाव, सुनिल देवरे, विनोद वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या