Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik : क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या...

Nashik : क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

फुले दांपत्याचे कार्य हे सोन्यालाही फिके पडणारे आहे. त्यांच्या आदर्शावर चालणे हे आपले सर्वांचे काम असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी सोहळ्यास माजी मंत्री महादेव जानकार, खासदार राजाभाऊ वाजे, आ. प्रा.देवायानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढीकले,आ. सरोज आहीरे,आ. दिलीप बनकर,आ. नितीन पवार,माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार,भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव,समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे,बाळासाहेब कर्डक, प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, लक्ष्मण सावजी, डॉ.शेफाली भुजबळ, अंबादास खैरे, मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, या शिल्पावरून ना. भुजबळ यांची कल्पकता दिसून येते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा हा महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वात मोठा पुतळा आहे. फुले दाम्पत्य हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी वंदनीय होते. त्यांच्या कार्याची उंची फुटपट्टीत मोजता येणार नाही. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानत. ते पुढे म्हणाले कि, नुसते रस्ते व पूल बांधले म्हणजे विकास होत नाही त्याकरिता सामाजिक भान दाखवायचे असते आणि ते आपले सरकार दाखवत आहे. आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. महात्मा फुले यांच्या स्वप्नाप्रमाणे सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले सरकार करत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपतींच्या सर्व मावळ्यांना एकत्रित करून आजचे कार्यक्रम घेतले आहेत. महात्मा फुले यांनी सतत प्रवाहाच्या विरोधात जाऊन दीनदुबळ्यांसाठी कल्याणकारक कार्य केले त्यामुळे आज आपल्याला परिवर्तन बघायला मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महात्मा फुले यांनी 1880 सालात शिवरायांची समाधी शोधून त्यावर फुले वाहिली. त्यांनीच शिवजयंती सुरु करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला त्यावेळी 27 रुपये लोकवर्गणी जमा झाली होती त्यातील 3 रुपये स्वतः फुले यांनी दिले. फुले दांपत्याचे समाजाप्रती योगदान बघता त्यांना भारतरत्न मिळावा हि सर्वसामान्यांची भावना आहे.

यावेळी बोलतांना ना. भुजबळ म्हणाले कि,महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक शहरात 1931 साली गणेशवाडीत अर्धाकृती पुतळा बसविला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्यासाठी आपल्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे.

ते म्हणाले की, मुंबई नाका येथील वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे 3366 मीटर आकाराचे हे बेट कमी करण्यात येऊन 2710 मीटरवर आणण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली. तसेच याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत रित्या होऊन येथील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

आजारी असतानाही ना. भुजबळ यांची स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास हजेरी
गेल्या दोन दिवसापासून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचार सुरू आहे. मात्र आज त्यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते विशेष विमानाने येऊन उपस्थित राहीले. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचार घेण्यासाठी ते रवाना झाले.

असे आहे स्मारकातील शिल्प –

महात्मा फुले 18 फूट, सावित्रीबाई फुले 16.50 फूट
दोन्ही पुतळ्याची रुंदी प्रत्येकी – 14 फूट
महात्मा फुले पुतळा 8 वजन टन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा वजन 7 टन
धातू – ब्रॉन्झ धातू
पुतळ्याची निर्मिती – प्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ
कुडाळ, रत्नागिरी, कोकण येथे निर्मिती
पुतळे बनविण्याचा कालावधी – 11 महिने
पुतळ्यांचा खर्च – 4 कोटी 68 लक्ष
हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी 8 फुट काँक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तसेच 30 ते 40 फूट पाईल फाऊंडेशन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या